कळंब – समय सारथी, अमर चोंदे
धाराशिव जिल्ह्यात पोलिसांनी अफुची लागवड करणाऱ्या विरोधात कारवाईची मोहीम उघडली आहे. कळंब पोलीस स्टेशन हद्दीतील कन्हेरवाडी शिवारात अफूची लागवड करणाऱ्या विरोधात कारवाई करीत 15 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त करण्यात आली आहेत.
कन्हेरवाडी ते मांडवा जाणाऱ्या रस्त्यालगत विलास नवनाथ कवडे यांच्या शेतामध्ये अफूची झाडे लावलेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अंदाजे 100 किलो अफूची झाडे आढळून आली. सदर कारवाई दोन शासकीय पंच, नायब तहसीलदार, कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. संपूर्ण कारवाईची व्हिडिओग्राफी करण्यात आली असून घटनास्थळी पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास कळंब पोलीस करीत आहेत. पोलीस अधीक्षक रितु खोकर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, विभागीय पोलीस अधिकारी कळंब,सपोनि मगर,पोउपनि घाडगे, पोह जाधवर,पोना शिंदे,पोका गजभार, करवर,मंगनाळे,मुंढे यांचा पथकात समावेश होता.











