धाराशिव – समय सारथी
ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात तुळजापूर येथे विनोद गंगणे हा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांनी कोर्टात केला असुन त्याप्रमाणे गंगणे यांच्या विरोधात पुरावे सादर करणे तपास यंत्रणासमोर एक मोठे आव्हान आहे. गंगणे यांचे 2 मोबाईल गहाळ झाले असुन त्यात अनेक महत्वाचे पुरावे असु शकतात त्या ‘गायब’ मोबाईलमध्ये ड्रग्जसह अन्य अवैध धंद्याची व त्यात गुंतलेल्या लोकांची ‘कुंडली’ आहे, त्यामुळे ते शोधणे मोठे आव्हान आहे. गंगणे हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जातात, ‘पोलखोल’ करीत पोलिसांना ते काय माहिती देतात याची काहींना ‘धडकी’ भरली आहे.
नाव येताच 2 मोबाईल गहाळ, पोलिसात नोंद – ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात 25 मार्च रोजी नाव निष्पन्न झाल्यावर गंगणे यांनी त्यांचे 2 मोबाईल फोन हे गहाळ झाल्याची तक्रार सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ पोलिस ठाण्यात 28 मार्चला दिली, या मोबाईल फोनमध्ये महत्वाचे पुरावे असुन ते मोबाईल कुठे आहेत? गंगणे यांनी त्याची कुठे विल्हेवाट लावली व पुरावे नष्ट केले. हे मोबाईल जप्त करणे व तपास करणे आहे असे ऍड देशमुख कोर्टात म्हणाले. गहाळ तक्रारची प्रत त्यांनी कोर्टात सादर केली. पुरावे नष्ट करण्यासाठी गंगणे यांनी हे कृत्य केले असुन यात त्यांनी क्रिमिनल माईंड (गुन्हेगारी मानसिकता) लागु केले.
ड्रग्ज गुन्ह्या सोबत मटका बुकी – ड्रग्ज तस्करीचा गुन्हा नोंद झाल्यावर विनोद गंगणे हे फरार होते मात्र तरी देखील त्यांचा मटका धंदा तेजीत होता. विनोद विलास गंगणे यांच्यासह अमोल माधवराव कुतवळ, विक्रम नाईकवाडी, चैतन्य शिंदे,सचिन पाटील यांच्यासह तब्बल 33 जणांना पोलिसांनी आरोपी केले असुन महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 4 व 5 नुसार गुन्हा नोंद केला आहे. छाप्यात पोलिसांना 6 मोबाईल, 1 लॅपटॉप, प्रिंटर, 65 हिशोबाच्या नोंद वह्या सापडल्या आहेत. 20 सप्टेंबर 2021 पासूनच्या मटका, एजन्ट, कमिशन व इतर आर्थिक व्यवहाराच्या नोंदी या 65 कागदपत्रात आहेत.
व्यसनमुक्तीनंतर सुद्धा ड्रग्ज खरेदी – विनोद व विजय गंगणे या दोन्ही बंधूनी व्यसनमुक्ती झाल्याचा दावा केला आहे. सोलापूर पूणे नंतर तेरणा नेरुळ येथे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी विनोद गंगणे याच्यावर उपचार केले असे विजय गंगणे याने पत्रकार परिषदेत सांगितले. राजकीय दबावामुळे तपासात तेरणा नेरुळ येथे उपचार घेतल्याचे कागदपत्रे उल्लेख केले नाही. हेतूत ती कागदपत्रे व पुरावे लपवून ठेवले, ते पोलिसांना शोधण्याचे आव्हान आहे. विनोद गंगणे जानेवारी 2024 ला ड्रग्ज मुक्त झाल्याचे कागदपत्रे सादर केली आहेत, त्यानंतर 2 लाख 97 हजार रुपयांच्या 85 पुड्या व 1 लाख 85 हजार (25 ऑगस्ट 24) ड्रग्ज खरेदी इतरांच्या नावे केली. विजय गंगणे याच्या खात्यावरून 18 हजार सप्टेंबर 24 ला संगीता गोळे खात्यावर पाठवले.
गंगणे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी – विनोद गंगणे हे तुळजापूर येथील मोठे राजकीय प्रस्थ असुन त्यांनी ‘भावी आमदार’ या रूपाने स्वतःला विधानसभा निवडणुकीवेळी ‘लॉन्च’ केले होते, हे स्थानिक नेतृत्वाला खुपले होते. गंगणे यांच्यावर मटकासह अन्य गुन्हे नोंद असुन त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी ही अडचणीची बाब आहे. ड्रग्ज तस्करी गुन्हा नोंद झाल्यावर गंगणे फरार होते, फरार असतानाही त्यांचा मटका तेजीत सुरु होता पोलिसांनी धाड मारल्यावर गंगणे हे मटका बुकी असल्याचे समोर आले. अवैध धंद्यात गंगणे यांचा सहभाग हा त्यांच्यासाठी अडचणींचा मुद्दा आहे.
गंगणे यांचे बँक खाते उतारा व कॉल डिटेल – पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल करताना 15 आरोपीच्या बाबतीत जो तपास केला तो सादर केला. गंगणे वापरत असलेल्या बँक खात्याचे स्टेटमेंट, इतर आर्थिक व्यवहार पोलीस तपासणार आहेत, गंगणे हे कोणत्या ड्रग्ज तस्कर यांच्या संपर्कात होते हे त्यानंतर समोर येणार आहे.
85 पुड्या ड्रग्ज खरेदी, 2 लाख 97 हजार दिले – संतोष खोत याने 27 फेब्रुवारी रोजी पोलिसांना दिलेल्या जबाबाप्रमाणे विनोद गंगणे याने 85 पुड्यांचे एक पार्सल स्वतः तुळजापूर येथे घेतले व तस्कर खोत याला 2 लाख 95 हजार दिले. याला पुरक असलेला जबाब अभिनव गोळे ( वैभव गोळेचा भाऊ) याने दिला असुन कोर्टात सुद्धा (164) त्याने तुळजापूर येथे ड्रग्ज डिलिव्हरी देण्यासाठी आल्याचे सांगितले आहे. या 85 पुड्या पैकी 50 पुड्या माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणे यांच्या तर 35 पुड्या स्वतःसाठी घेतल्या होत्या.
शांत डोक्याने रचलेला गुन्हेगारी कट – विनोद गंगणे यांनी संतोष खोतला ड्रग्ज हवे आहे असा एएमएस केला त्यानंतर त्याने संगीता गोळे हिचा नंबर पाठवत सांगितले की भाऊ ह्या वाहिनीच्या खात्यावर फोन पे करा. त्यानंतर गंगणे यांनी इतरांच्या मोबाईलवरुन 1 लाख 85 हजार रुपये ड्रग्ज तस्कर संतोष खोतकडे पाठवले. गंगणे याने सुमित शिंदे, अविनाश मुळे, सागर गंगणे, सत्यम साठे या 4 जणांच्या मोबाईलवरुन पाठवल्याचे अकाऊंन्ट स्टेटमेंट मधून निष्पण होते, गंगणे यांनी त्यांना कॅश दिली व फोन पे करायला सांगितले. गंगणे हा दुसऱ्याच्या नावे असलेला मोबाईल वापरायचा याचा अर्थ त्याने शांत डोक्याने कट रचला व गुन्हेगारी कृत्य केले. या सर्वांनी तसे जबाब दिले असुन पोलिसांनी त्यांना साक्षीदार केले आहे.