ड्रग्ज तस्करीचा तुळजापूर येथील सुत्रधार विनोद गंगणे, कोर्टात दावा
किंग इज बॅक, बाप बाप होता है पोस्टचा सोशल मीडियावर धुमाकूळ
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात जिल्हा सरकारी वकील महेंद्र देशमुख यांची महत्वाची भुमिका राहिली, त्यांनी कोर्टात तपासाचे मुद्दे, उपलब्ध पुरावे व कायदेशीर बाजु मांडल्यामुळे आरोपींचा जामीन नाकारला जात आहे. ऍड देशमुख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी आरोपी गंगणेसह अन्य आरोपींचा जामीन नाकारला आहे. आरोपीला पुढील सुनावणी पर्यंत अटकेपासुन तात्पुरता दिलासा मिळाल्यानंतर गंगणे यांच्या समर्थकांनी ‘किंग इज बॅक, बाप तो बाप होता हे’ असे सोशल मीडियावर टाकले ही बाब देशमुख यांनी कोर्टात मांडली. (ड्रग्ज प्रकरणात) हो तुम्ही किंग आहेत आम्ही तेचं तर म्हणतो आणि तपास होऊ द्या,असे देशमुख म्हणाले. वाघ परत आला, हो मग बाप आलाय उडायला, टायगर अभी जिंदा है यासह अन्य पोस्ट टाकल्या होत्या.
ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात पोलिसांचा खबरी असल्याचा दावा करीत आरोपी विनोद गंगणे यांनी कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. दोषारोपपत्र दाखल करताना पोलिसांनी गंगणे यांच्यासह 10 जणांना सेवन गटात आरोपी केले होते, त्यांनी अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला त्या सुनावणीत अनेक घडामोडी घडल्या, तपास अधिकारी व सरकारी वकील देशमुख यांनी पुरावे व कायदेशीर बाबी मांडल्या.
संगीता गोळे, वैभव गोळे व संतोष खोत हे मुंबई येथील ड्रग्ज तस्करीचे सुत्रधार आहेत तर विनोद गंगणे हे तुळजापूर येथील सुत्रधार आहेत असा दावा कोर्टात केला गेला. गंगणे यांनी तब्बल 12 लाख रुपयांचे ड्रग्ज खरेदी केले, त्यांचे मुंबई येथील तस्करासह इतर अनेक आरोपीशी थेट संभाषण व आर्थिक व्यवहार आहेत. गंगणे यांनी एकाच वेळी लाखो रुपयांचे ड्रग्ज खरेदी केले. 1 लाख 85 हजार रुपयांचे ड्रग्ज खरेदी करताना त्यांनी शांत डोक्याने कट रचला व मोबाईल क्रमांक दुसऱ्याचा वापरला. शिवाय कॅश देऊन 4 जणांच्या फोन पे वरून तस्कर संगीता गोळे हिच्या बँक खात्यावर पैसे टाकले व ड्रग्ज मागवले. हा मुद्दा कोर्टात महत्वाचा ठरला.
पोलिसांनी जो तपास केला, दोषारोपपत्र दाखल केले ते त्यावेळी अटक आरोपीबाबत झालेल्या तपासाचे होते, गंगणे बाबत तपास झाला नाही अशी बाजु ऍड देशमुख यांनी मांडली. गंगणे यांनी जे 12 लाख ड्रग्ज खरेदी केले, ते कोणाला दिले, त्यातील काही ड्रग्ज शिल्लक आहे का ? तपास चौकशी करायला हवी, ड्रग्ज साठा आहे का? तो कुठे ठेवला आहे, याचा तपास होणे गरजेचे आहे अशी बाजु मांडली.