धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात आरोपी विनोद गंगणे यांच्या जामीन अर्ज सुनावणीच्या वेळी कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आरोपी, सरकारी पक्ष व पोलिसांनी कोर्टात बाजु मांडली. सुनावणी दरम्यान कोर्टाने तपास अधिकारी यांना काही प्रश्न विचारले त्यावर सपोनि गोकुळ ठाकुर हे अनुत्तरीत झाले. दोषारोप पत्र दाखल करताना तस्कर व सेवन असे 2 गट केले ते कोणत्या आधारावर, गंगणे याच्या विरोधात दोषारोप पत्र वेळी पुरावे होते तर मग त्यांना त्याचं वेळी तस्कर गटात का सहभागी केले नाही ? त्यांना त्यावेळी फेव्हर (मदत करायची) द्यायचं व सगळं कोर्टावर सोडून द्यायचं. राजकीय कारण किंवा राजकीय दबाव होता का ? गंगणे हे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत हे कारण होते का ? यांचे उत्तर फक्त तपास अधिकारीच देऊ शकतात असा सवाल केला कोर्टाने केला त्यावर तपास अधिकारी गप्प राहिले. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी कोर्टात बाजु मांडली.
तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात सुरुवातीपासूनच आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा राजकीय दबाव असल्याचे बोलले जात होते, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे विनोद गंगणे यांनी टीप दिली, गंगणे यांच्यावर बडोदा येथे उपचार केले. आमदार राणा यांना डिसेंबर 2023 मध्ये तुळजापूर ड्रग्ज तस्करीबाबत माहिती होती, त्यानंतरही ते गप्प होते. ड्रग्ज गुन्ह्याच्या तपासाच्या प्रत्येक टप्यावर आमदार राणा पाटील स्वतः लक्ष ठेवुन होते. आमदार कैलास पाटील यांचे लक्षवेधीचे उत्तर आमदार पाटील यांचे खासगी स्वीय सहायक गणेश भातलवंडे यांनी लीक करीत सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या सगळ्या घडामोडी पाहता यात आमदार पाटील यांचा तपास यंत्रणावर दबाव असल्याचे दिसते. आता कोर्टाने सुद्धा या प्रकरणात राजकीय दबाव होता का? हा प्रश्न विचारला आहे.
धाराशिव कोर्टात झालेल्या युक्तिवादात अनेक कायदेशीर मुद्दे समोर आले. गंगणे हे इन्फॉर्मर होते हे तपासले का ? पोलीस आता सांगत आहेत की गंगणे याच्या विरोधात पुरावे आहेत. ते तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीचे मुख्य सुत्रधार आहेत. पोलीस ज्या दोषारोप पत्राचा व कागदपत्राचा आधार घेत आहेत त्यात सर्व पुरावे असताना देखील त्यांना सेवन गटात का टाकले ? दोषारोप पत्रात का नमुद केले नाही असे अनेक प्रश्न कोर्टाने उपस्थिती केले.
तपासाचे सगळे कागदपत्रे तुमच्याकडे होते तर मग काही जणांना 10 जणांच्या सेवन गटात कसे काय टाकू शकतात, तपासाच्या आधारे हे कसे ठरवले. तपास अधिकारी गोकुळ ठाकुर यांना कोर्टाने अनेक मुद्यावर कोंडीत धरले. राजकीय दबाव होता का यांचे उत्तर फक्त तुम्हीच तपास अधिकारी म्हणुन देऊ शकता. गंगणे यांनी 12 लाख रुपयांचे ड्रग्ज खरेदी केले असे सांगत आहेत, तुमच्या दोषारोप पत्रात सगळे होते मग त्यांना का सेवन गटात टाकले. जामीन अर्जावर सुनावणी झाल्यावर आरोपी विनोद गंगणे हे काही काळ कोर्ट रूम सोडून बाहेर गेले, त्यावरून कोर्टाने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांना त्यांच्या वकिलांनी कोर्टात हजर केले.