खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील. यांची संयुक्त पत्रकार परिषद
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात पोलिसांनी काही आरोपीना वाचवण्यासाठी अनेक त्रुटी केल्या असून मुंबई व सोलापूर येथील मुख्य आरोपींसह अन्य नावे समोर येऊनही त्यांना अभय देण्यात आले आहे. पोलीस आरोपींना जामीन मिळावा यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत असून आरोपींवर मकोको अंतर्गत कारवाई करावी यासाठी मुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. तपासात गंभीर चुका असुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्व कागदपत्रे दाखवणार आहे. ड्रग्ज रॅकेट संपूर्ण नष्ट होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. कोर्टात आरोपीना जामीन मिळावा यासाठी पोलिसांनी मदत केल्यास त्यांची तक्रार मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असुन पोलीस कोर्टात काय भुमिका घेतात यावर आमचे लक्ष आहे असे ते म्हणाले.
तुळजापुरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना ड्रग्ज प्रकरणाबद्दल डिसेंबर 2023 मध्ये माहिती होती असे आरोपी विनोद गंगणे याचे भाऊ विजय गंगणे जाहीर पत्रकार परिषदेत सांगतात, आमदार सुद्धा स्वतः कबुल करतात. आपण स्वत: ड्रग्ज रॅकेट संदर्भात पोलीसांना माहिती दिली असल्याचे आमदार पाटील व गंगणे यांनी त्यांच्या मुलाखतीतून सांगितले होते. तुळजापुर तालुक्यात ड्रग्ज रॅकेट सक्रीय असल्याची माहिती आमदार पाटील यांना डिसेंबर 2023 मध्ये मिळाली होती तर प्रत्यक्षात प्रथम गुन्हा दाखल होण्यास 1 वर्ष 1 महिण्याचा कालावधी लागला असा प्रश्न ओमराजे यांनी उपस्थितीत केला आहे. 1 वर्षाच्या कालावधी केवळ निवडणुका डोळयासमोर ठेवून किंवा राजकीय स्वार्थापोटी त्यांनी पोलिसांना काही सांगितले नाही.
धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेमध्ये या प्रश्नावर लक्ष वेधी सुचना मांडली होती परंतू आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे स्वीय सहाय्यक यांनी सदर माहिती विधानसभेत देण्यापुर्वीच हस्तगत करुन समाज माध्यमातून प्रकाशीत करीत उत्तर लीक केले यावरुन आमदार राणा पाटील यांनी आरोपींना वाचविण्यासाठी घेतलेली भुमीका दिसुन येते. पोलीस तपास अधिकाऱ्यावर असणारा राजकीय दबाव या प्रकरणातील तस्कर गटातील आरोपी व सेवन गटातील आरोपी अशी केलेली वर्गवारी कोणा एका व्यक्तीस वाचविण्यासाठी केलेला द्रविडी प्राणायाम वाटतो अशी टीका केली.
गंगणे याला सोलापूर, पुणे नेरुळ बडोदा येथील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले होते. संबंधीत आरोपी विनोद गंगणे हा सेवन गटातील आरोपी असून अन्य आरोपीच्या जबाबात या आरोपीने एकाच वेळी 85 ड्रग्जच्या पुडया खरेदी केल्याची माहिती दिली. आरोपीने इतरांच्या मोबाईलवरुन 1 लाख 85 हजार रुपये ड्रग्ज तस्कर संतोष खोतकडे पाठवले. गंगणे याने सुमित शिंदे, अविनाश मुळे, सागर गगणे, सत्यम साठे या 4 जणांच्या मोबाईलवरुन पाठवल्याचे अकाऊंन्ट स्टेटमेंट मधून निष्पण होते, आरोपीने त्यांना कॅश दिली व फोन पे करायला सांगितले. गंगणे हा दुसऱ्याच्या नावे असलेला मोबाईल वापरायचा याचा अर्थ त्याने शांत डोक्याने कट रचला व गुन्हेगारी कृत्य केले.
विनोद गगणे यांनी 2 लक्ष 97 हजार रुपयाचे ड्रग्ज एकाच वेळी खरेदी केली असल्याचे आरोपी संतोष खोत याच्या जबाबातून व अभिनव गोळे याच्या पोलीस व कोर्टातील जबाबातुन निष्पण झाले आहे, 85 ड्रग्ज पुड्या त्याने स्वतः घेतल्या, मग तो सेवन गटात कसा? ड्रग्ज मुक्त झाल्याचा दावा केल्यानंतर देखील गंगणे याने मुंबई येथील व इतर आरोपीसोबत ड्रग्जचे व्यवहार केले, त्याचे पुरावे आहेत. या सर्व बाबी पोलिसांनी कोर्टात गंगणे याच्या जामीन वेळी मांडव्यात असे ओमराजे म्हणाले.
ड्रग्ज गुन्हयातील फरार आरोपी बापू कणे यांच्या बँक अकाऊंन्ट स्टेटमेंटची एकूण 24 पाने असून न्यायालयातील आरोप पत्रात केवळ 4 पाने जोडलेले असून उर्वरीत 20 पाने जोडली नाहीत. कणे याचे कोणाशी अर्थपुर्ण व्यवहार झाले आहे हे निष्णण होत नाही त्यामुळे तपास करावा. कोणा एका व्यक्तीस वाचविण्याच्या उद्देशाने हे सगळे सुरु असुन पोलीस तपास अधिकारी यांच्यावर राजकीय दबाव आहे का आणि पोलीस तपास अधिकारी कोणास वाचविण्याकरीता अशा प्रकारचा दिशाभुल करणारा तपास करीत आहेत असे ओमराजे म्हणाले.
सोलापूर येथील ड्रग्ज तस्कर पिटया सुर्वे याच्याकडून गजानन हंगरकर व इतर सेवन गटातील आरोपी यांनी ड्रग्ज घेतले असल्याची माहिती आरोपींच्या जबाबात दिसून येते. परंतू ड्रग्ज प्रकरणाचा पिटया सुर्वेच्या संदर्भाने अद्याप तपास झालेला नसून पोलीसांची भुमीका ही संभ्रम निर्माण करणारी आहे. संगिता गोळे व संतोष खोत यांच्या जबाबातून मुंबई येथे तस्कर अतुल आग्रवाल याचे नाव आले असून सदर व्यक्तीचा मोबाईल फोन आजही सुरु असून अद्याप या व्यक्तीची कोणत्याही प्रकारची ड्रग्ज प्रकरणाच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आलेली नाही, हे संशयास्पद असुन या बाबी मुख्यमंत्री यांना सांगणार आहे.
संगीता गोळे हिला 22 फेब्रुवारीला अटक केली, पोलीसांनी संगीता गोळे यांच्या ड्रग्ज प्रकरणातील सहभाग व अटकेविषयी तिचा पती वैभव गोळे यांना माहिती दिली. मुळत: वैभव गोळे हा ड्रग्ज प्रकरणा संदर्भात मुख्य गुन्हेगार असून पोलीसांनी वैभव गोळेस माहिती दिल्यानंतर तो फरार झाला आहे. 23 फेब्रुवारीला कोर्टात संगीता गोळेचे रिमांड कोर्टात सादर करताना वैभव गोळे वरती ड्रग्ज प्रकरणाच्या अनुषंगाने 2 गुन्हे दाखल असल्याचे नमुद केले. पोलिसांना माहिती असताना गोळेवर लक्ष ठेवले नाही त्यामुळे तो फरार झाला यामुळे कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
तुळजापुर ड्रग्ज प्रकरणात काही पोलीस कर्मचारी यांचा सहभाग असल्याचे आरोपीच्या जबाबातून स्पष्ट होत आहे. महाराष्ट्र मुख्यमंत्री यांनी ड्रग्ज प्रकरणात पोलीस कर्मचारी व अधिकारी असल्यास त्यास निलंबीत न करता बडतर्फ करण्याचे अश्वासन दिले होते परंतू अद्याप त्या पोलीस कर्मचारी याची साधी चौकशी सुद्धा करण्यात आली नाही. अद्याप तस्कर गटातील आरोपी व सेवन गटातील बरेच आरोपी फरार असून यांना अटक झाल्यानंतर दुध का दुध पाणी का पाणी होणार आहे. आरोपीवर मकोको लावावा, फरार आरोपीची संपत्ती जप्त करावी शिवाय ड्रग्जमधुन कमावलेली संपत्ती शासन जमा करावी अशी मागणी त्यांनी केली.