चिंताजनक – शुक्रवारी कोरोनाचे जिल्ह्यात 173 रुग्ण तर 45 कोरोनामुक्त
जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल 10 जण पॉझिटिव्ह सापडले
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने शुक्रवारी कहर केला असून तब्बल 173 रुग्ण सापडले असून 45 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसेंदिवस कोरोना स्तिथी गंभीर बनत चालली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल 10 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. नमुने तपासणीत रुग्ण पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण 10.15 टक्के राहिले. शुक्रवारी 1 हजार 703 रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी 173 म्हणजे 10.15 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले त्यात रॅपिड चाचणीत 109 तर आरटीपीसीआर चाचणीत 64 जण पॉझिटिव्ह आले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक 81 रुग्न सापडले. जिल्ह्यात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 765 झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रववारी 173 रुग्ण सापडले त्यात तुळजापूर 14, उमरगा 30, लोहारा 10, कळंब 16 व भूम व परंडा तालुक्यात प्रत्येकी 2 रुग्ण सापडले. उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर कोरोनाचे 68 हजार 671 रुग्ण सापडले त्यापैकी 65 हजार 815 रुग्ण उपचार नंतर बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 95.84 टक्के आहे. जिल्ह्यात आजवर 1 हजार 509 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून मृत्यू दर हा 2.19 टक्के आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या उपाययोजना करण्यात आल्या असून आरोग्य प्रशासन दक्ष व सज्ज झाले आहे. महसूल व पोलीस यंत्रणाही कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी काळजी व प्रतिबंधात्मक कारवाई करीत आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयासह इतर रुग्णालयात 5 हजार 445 बेडस तयार करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात 1 हजार 65 बेड उपलब्ध आहेत. 1 हजार 400 ऑक्सिजन बेड, 183 व्हेंटिलेटर, 199 आयसीयू बेडची गरजेनुसार उपलब्धता करण्यात येणार आहे तर खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड कोरोना रुग्णासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.जिल्ह्यात 52.44 मेट्रिक टन लिक्वीड ऑक्सिजन उपलब्ध होणार असून 12.14 मेट्रिक टन ऑक्सिजन हा हवेतून जमा करून सिलेंडरमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे.