सुनावणी पूर्ण – तेरणा कारखान्याबाबत गुरुवारी कोर्टाचा निकाल
औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष
उस्मानाबाद – समय सारथी
तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याबाबत 22 फेब्रुवारी रोजी मंगळवारी औरंगाबाद उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून दोन्ही पक्षाचा युक्तीवाद संपला आहे. तेरणाबाबत गुरुवारी निर्णय येणार असून कोर्ट काय निर्णय देते याकडे लक्ष आहे. भैरवनाथ उद्योग समूहाने निविदा प्रक्रिया रद्द करण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे, त्या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली आहे.
ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखानाबाबत डीआरटी कोर्टाने (कर्ज वसुली न्यायाधिकरण ) धक्कादायक निर्णय दिला होता. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्याची निविदा प्रक्रिया रद्द ठरवीत निविदा प्रक्रिया पुन्हा राबविण्याचे आदेश दिले होते. या निर्णयामुळे तेरणा कारखाना निविदा प्रकरणी जिल्हा बँक व भैरवनाथ उद्योग समूहाला मोठा झटका बसला होता. तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबवायची झाली तर भैरवनाथ समूहाने भविष्य निर्वाह विभागाकडे भरलेल्या साडे पाच कोटी रुपये बँकेला व्याजासह भैरवनाथ समूहाला परत द्यावे लागणार आहेत मात्र बँकेची आर्थिक स्तिथी सध्या खराब आहे.
तेरणा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या निविदा प्रक्रियाचा वाद ट्वेंटीवन शुगरने डीआरटी कोर्टात (कर्ज वसुली न्यायाधिकरण) दाखल केला होता त्यावर कोर्टाने निविदा प्रक्रिया रद्द करीत फेरनिविदा घेण्याचा निर्णय दिला आहे. निविदा प्रक्रिया राबविताना 15 दिवस कालावधी ऐवजी 12 दिवसांचा वेळ ठेवल्याने निविदा प्रक्रिया रद्द केली आहे.
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तेरणा कारखाना शिवसेना आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ उद्योगसमूहला 25 वर्षासाठी भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता मिळाली होती.जिल्हा बँकेची आर्थिक स्तिथी सुधारायची असेल तर तेरणा साखर कारखाना सुरु होणे गरजेचे आहे कारण बँकेचे तेरणा कारखान्यावर करोडो रुपयांचे कर्ज आहे. जिल्हा बँक व तेरणा कारखाना या दोन्ही संस्था पुनर्जीवीत करण्यासाठी भाडेतत्वावर लवकर निर्णय होणे गरजेचे आहे.