धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जांभळे यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी दिले आहेत. पोदार स्कुलमधील शिक्षक हैदर अली शेख याच्यावर सहशिक्षिकावर बलात्कार केल्याचा गुन्हा नोंद केला होता. त्या गुन्ह्यात तपासात अली याला मदत केल्याचा ठपका ठेवत जांभळे यांचे निलंबन केले आहे. हैदर अली शेख याला अटक केल्यावर पोलिस कोठडी मागणे अपेक्षित असताना जांभळे यांनी रिमांडमध्ये न्यायालयीन कोठडी मागितली. जप्ती पंचनामा करताना व्हिडिओग्राफी करणे बंधनकारक असताना तो न करणे, गुन्ह्याशी संबंधित पीडिता व आरोपी कार्यरत असलेल्या शाळेतील, लॉजवरील साक्षीदार यांचे जबाब न घेणे, गुन्हा नोंद झाल्यावर 24 तासात घटनास्थळ पंचनामा न करणे यासह अन्य ठपका ठेवला आहे. अली हा सध्या धाराशिव येथील जेलमध्ये आहे.
पोदार स्कुलमधील सिनिअर कोओर्डीनेटर असलेला शिक्षक हैदर अली शेख याने सहशिक्षिकेला विविध आमिष दाखवून सोलापूर व धाराशिव येथे लॉजवर नेहून बलात्कार केल्याप्रकरणी आनंदनगर पोलिसात गुन्हा नोंद केला आहे, हा शिक्षक पिडीत शिक्षिकेस तु चांगले शिकवतेस. माझ्या ओळखी आहेत, तुझे प्रमोशन करुन एअर लीडर करतो असे सांगत आमिष दाखवायचा व तिच्यावर बळजबरीने बलात्कार करायचा असे फिर्यादीत नमुद आहे, हैदर अली शेख याच्या वर्तनाबाबत अनेक तक्रारी आहेत.
जांभळे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी त्यांचे निलंबन केले आहे. धाराशिव येथील पोस्कोच्या गुन्ह्यात आरोपी बाळु अशोक काळे व आनंद नगर येथील पोस्को गुन्ह्यात आरोपी अलीम करीम शेख याची पोलिस कोठडी न मागता न्यायालयीन कोठडी मागणे, बेंबळी पोलिस ठाण्यातील पोस्को गुन्ह्यात आरोपी अंबेवाडी येथील ओम गुणवंत कदम याला अटक न केल्याने आरोपीचा अटकपुर्व जामीन झाला, त्यावर वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली नाही. पोस्को गुन्हा दाखल होऊन आरोपी सौरभ चंद्रकांत शिंगाडे याला अटक न करणे अश्या प्रकरणात ठपका ठेवला आहे.
आरोपीना जामीन मिळण्यासाठी मदत करणे, महिला व बालक विषयी गुन्ह्यात असंवेदनशील दृष्टीकोन ठेवणे, तपासात उणीवा, निष्काळजीपणा ठेवुन आरोपीला मदत करणे असा प्रकार गंभीर असुन त्यामुळे जांभळे यांचे निलंबन करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांना मुख्यालय नियंत्रण कक्ष येथे संलग्न करण्यात आले आहे.
पोदार स्कुलच्या पालकांनी 25 मार्च 23 रोजी पोदार स्कुलच्या प्रशासनाकडे लेखी तक्रार दिली होती त्यात अनेक बाबी नमुद होत्या, त्यावर कारवाई न झाल्याने पुन्हा एकदा 7 डिसेंबर रोजी लेखी तक्रार दिली आहे. शिक्षक हैदर अली शेख याच्या विरोधात अनेक तक्रारी असतानाही स्कुलने त्याला प्रमोशन देऊन एक प्रकारे त्याच्या चुकावर पांघरून टाकले आहे असा पालकांचा आरोप आहे. अभ्यासक्रम शिकवीला न जाणे, तक्रार करणाऱ्या विद्यार्थी यांना टार्गेट करणे, शाळेतील काही शिक्षक खासगी क्लासेस घेत असणे, मुलींचा ड्रेस कोड, प्रशिक्षित शिक्षक नसणे, अपुरा स्टाफ यासह अन्य बाबी तक्रारीत नमुद केल्या आहेत, त्यातील मुलींशी गैरवर्तनाचा प्रकार गंभीर आहे. येत्या 2 दिवसात कारवाई न झाल्यास 11 डिसेंबरला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.