धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे उपजिल्हा रुग्णालय मंजुर करण्यात आले असुन तेरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यासाठी शासनाने अध्यादेश काढत मान्यता दिली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी याबाबत घोषणा केल्यानंतर त्याची पूर्तता करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री सावंत यांनी धाराशिव जिल्ह्यात आरोग्यक्रांती करीत अनेक आरोग्य संस्थांनाचे बळकटीकरण व श्रेणीवर्धन केले आहे.
तेरखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास शासकीय मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे तेरखेडा आणि आसपासच्या गावातील नागरिकांना अपघात व अन्य आपत्कालीन प्रसंगी त्वरित आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
राष्ट्रीय महामार्ग 52 जवळील अपघातप्रवण क्षेत्रामुळे अनेक गंभीर रुग्ण धाराशिव किंवा सोलापूर येथील मोठ्या रुग्णालयात पोहोचण्याआधीच प्राण गमवावे लागत असे. तसेच तेरखेडा परिसरातील फटाका कारखान्यांमधील कामगारांसाठी तातडीच्या उपचारांची गरज असते. आता या उपजिल्हा रुग्णालयामुळे या सर्वांना तातडीच्या वैद्यकीय सेवांचा लाभ मिळेल आणि मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होईल.
महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी या आरोग्यविषयक महत्त्वाच्या मागणीला एक महिन्याच्या आतच तात्काळ मंजुरी दिली आहे. त्यांचे या लोकहितकारी निर्णयासाठी आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत याचे गावकऱ्यांनी आभार मानले आहेत.