भंगार घोटाळा – उस्मानाबाद नगर परिषदेच्या आवरातून साहित्य चोरीचा अहवाल सादर करण्याचे आदेश
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद नगर परिषदेच्या आवरातून भंगार साहित्य चोरी केल्याच्या प्रकरणी चौकशी करुन 8 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्याण यलगट्टे यांनी दिले आहेत. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विनापरवाना खासगी वाहनातून लाखो रुपयांचे भंगार चोरून विकण्यात आले असून या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्याधिकारी यांनी दिले आहेत.
नगर परिषद अतिक्रमण हटाव पथकाकडून जप्त करण्यात आलेले साहित्य नगर परिषद कार्यालयात आणले होते मात्र हे साहित्य 23 जुलै व 24 जुलै 2022 रोजी शनिवार व रविवार या सार्वजनिक सुट्टयाच्या दिवशी खासगी वाहनात भरून विक्री केल्याची तक्रार मुख्याधिकारी यांच्याकडे आली होती. तसेच या प्रकरणात प्राथमिक तपासणीमध्ये नगर परिषद कर्मचारी विलास गोरे व नगर परिषदमध्ये काम करणारा एक ठेकेदार सामील असल्याचे समोर आले आहे असे पत्रात नमूद केले आहे.
या प्रकरणात सर्व वाहनचालक, घंटा गाडी चालक, सुट्टीच्या दिवशी कार्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी तसेच नगर परिषद कार्यालय आवारात असलेले सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याची पडताळणी करुन सदरचे साहित्य किती होते व त्याची किमंत काय होती आणो या प्रकरणामध्ये कोणकोणत्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता याबाबत सखोल चौकशी करुन 8 दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्याधिकारी यलगट्टे यांनी दिले आहेत.
उस्मानाबाद नगर परिषदेच्या घंटा गाडी विक्री प्रकरणाचीही चौकशी होणे गरजेचे आहे तसेच या भंगार विक्री प्रकरणात प्राथमिक तपासणीत एक कर्मचारी व ठेकेदार सहभागी असल्याचे समोर आल्याने आता गुन्हे नोंद कधी होणार का हे पाहावे लागेल.