धाराशिव – समय सारथी
शेतजमिनीचा फेरफार घेण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी एका तलाठयाला 3 वर्षाची शिक्षा व 10 हजार रुपयांचा दंड धाराशिव येथील जिल्हा कोर्टाने ठोठावला आहे.उत्तमराव पांडुरंग तांबे, तलाठी सज्जा आंबेवाडी, अतिरिक्त कार्यभार कामेगाव व रुईभर असे तलाठी यांचे नाव आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजेश एस. गुप्ता यांनी हा निकाल दिला.
तांबे याच्या विरोधात धाराशिव ग्रामीण पोलीसात 2011 साली कलम 7, 13(1)(ड) सह 13(2) ला.प्र. अधिनियम, सन 1988 अन्वये गुन्हा नोंद झाला होता. तांबे यांनी तक्रारदार यांचे शेत गट नं 102 क्षेत्र 2 हेक्टर 2 आर शेत जमिनीचा फेरफार प्रतिवादी श्री वसंत नरवडे यांचे नावे मंडळ निरीक्षक यांना सांगुन न करण्यासाठी 5 हजाराची मागणी करून ते पंचा समक्ष स्वीकारले होते. तपासी अधिकारी श्रीमती अश्विनी भोसले तत्कालीन पो. नि. लाप्रवी यांनी याचा तपास केला होता.सरकारी अभियोक्ता श्रीमती जोशी यांनी काम पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणुन पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, पो शी जे. ए. काझी यांनी काम पाहिले.
तांबे यांना कलम 7 अन्वये 3 वर्ष कारावास व 10,000/- रु दंड, दंड न भरल्यास 15 दिवस कारावास व कलम 13(1)(ड), 13(2) अन्वये 02 वर्ष कारावास व 10,000/- रु दंड, दंड न भरल्यास 15 दिवस कारावास अशी शिक्षा ठोठावली.