धाराशिव – समय सारथी
वसंतदादा बँक घोटाळ्यात चेअरमन तथा मुख्य सूत्रधार आरोपी विजय नाना दंडनाईक व इतर आरोपीच्या अटकेसाठी आर्थिक गुन्हे शाखेने पोलिसांच्या मदतीने पुन्हा एकदा शोध मोहीम उघडली आहे. गुन्हा नोंद झाल्यापासून तब्बल 6 महिने झाले तरी जवळपास 18 आरोपी पैकी एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पोलिसांनी दंडनाईक यांचे घर, कार्यालयात शोध घेतला तसेच इतर आरोपीचा ही ठावठिकाणा शोधला.
दंडनाईक व इतर काही संचालक यांचा अटकपुर्व जामीन अर्ज धाराशिव येथील न्यायाधीश किरण बागे पाटील यांनी फेटाळल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात अर्ज केला होता मात्र कोर्टाने जामीन नाकारणार असल्याचे सांगताच त्यांनी अर्ज मागे घेतला तर काहींचा जामीन फेटाळला.वसंतदादा बँकेच्या घोटाळ्याचा आर्थिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक संतोष शेजाळ हे तपास करीत आहे. या घोटाळ्यात दंडनाईक यांचा संचालक मुलगा पृथ्वीराज,पत्नी सुरेखा असे कुटुंब अडकले आहे. या घोटाळ्यातील आरोपी फरार असुन पोलिस त्यांच्या कायम मागावर आहेत त्यामुळे ही ससा व कासव दौड संपलेली नाही.
वसंतदादा बँकेत ओव्हर ड्राफ्ट, स्वयं रोजगार कर्ज असे बोगस कर्जवाटप करुन करोडो रुपयांची रक्कम चेअरमन विजय दंडनाईक यांनी त्याच दिवशी त्यांच्या खात्यावर घेतली व नंतर ती जयलक्ष्मी साखर कारखान्यात गुंतवणूक केली. त्या कारखान्यात दंडनाईक यांची मुले, पत्नी असा परिवार आहे. सुरेखा दंडनाईक यांच्या बचत गटाला नियमबाह्य कर्ज दिले असा ठपका आहे.
वसंतदादा बँकेतून संशयित स्वयंरोजगार कर्ज, बचत गटाला कर्ज व ओव्हर ड्राफ्ट देताना संचालक मंडळाने कोणतीही कागदपत्रे न घेता मंजुरीचा ठराव घेऊन तात्काळ मान्यता दिली, कर्जवसुल होणार नसल्याचे ज्ञात असतानाही ते वाटप केले आणि जाणीवपूर्वक वसुलीसाठी पावले उचलली नाहीत त्यामुळे त्यांचा या घोटाळ्यातील सहभाग अधोरेखित होतो असे निरीक्षण नोंदविले.
ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदार यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कलम 420,409,34 सह महाराष्ट्र ठेवीदारांचा वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम 3 व 4 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. प्रभात सहकारी बँकेने 1 कोटी 81 लाख ठेवले होते त्यांना 2 कोटी 31 लाख देणे असताना ते मुदत संपूनही दिले नाही त्यामुळे 28 जुलै 2023 रोजी गुन्हा नोंद केला आहे.
वसंतदादा बँक घोटाळ्यातील आरोपी
पृथ्वीराज विजय दंडनाईक, सुरेखा विजय दंडनाईक, गणेश दत्ता बंडगर, रामलिंग धोंडीअप्पा करजखेडे, शुभांगी प्रशांत गांधी, कमलाकर बापूराव आकोसकर,गोरोबा झेंडे, हरिश्चंद्र शेळके, इलाही बागवान, प्रदीप कोंडीबा मुंडे, लेखापरीक्षक भीमराव ताम्हाणे,विष्णुदास रामजीवन सारडा, व्यवस्थापक दीपक देवकते, महादेव गव्हाणे,लक्ष्मण नलावडे, सुरेश पांचाळ, नीलम चंपतराय अजमेरा हे आरोपी आहेत.