धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यातील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना ढोकी येथील साखर घोटाळा प्रकरणी तत्कालीन चेअरमन कै पवनराजे निंबाळकर,माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह अन्य आरोपींची धाराशिव येथील कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. 2002 साली सीआयडीने तपास केल्यानंतर दाखल झालेल्या या प्रकरणात तब्बल 21 वर्षानंतर निकाल लागला आहे. यात तेरणेच्या तत्कालीन 4 चेअरमन यांची निर्दोष मुक्तता केली असुन त्यावेळी हा घोटाळा राज्यभर गाजला होता.
2001 मध्ये तेरणा शेतकरी साखर कारखाना येथून साखर विक्रीची जाहिरात देण्यात आली होती. त्यात मुंबई येथील रिगल इनपेक्स याच्या निविदेला संचालक मंडळाने मान्यता दिली मात्र कोलकत्ता येथील साखर व्यापाऱ्यांना फ्रीसेलची साखर देण्यात आली.
चुकीच्या पद्धतीने साखर विक्री करुन 48 लाखांचा स्वतः फायदाच करुन घेतला तर 94 लाख 59 हजार रुपयेचा साखर कारखान्यास तोटा झाला अशी फिर्याद दिल्याने कलम 406,409,465,472,109,120(ब) जीवनावश्यक वस्तू कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करुन दोषारोपपत्र कोर्टात सादर केले होते, सुनावणी दरम्यान पवनराजे यांचा मृत्यू झाला.
डॉ पद्मसिंह बाजीराव पाटील, पवनराजे निंबाळकर, रामेश्वर कारवा, शिवदास होनमाने, तानाजी शेंडगे, विवेक कुलकर्णी, राधेश्याम सोमाणी, मुकेश ओसवाल, ललित ओसवाल, अशोक शिनगारे, पवनकुमार झा उर्फ शर्मा, राजीव पाठक, मुकुंद पाठक, प्रमोद दिवेकर,मंगल बाळासाहेब पाटील, अब्दुल रशीद काझी यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.
याप्रकरणात ॲड विजयकुमार शिंदे, पंडीत नळेगावकर, विश्वजीत शिंदे, निलेश बारखेडे, विष्णु डोके सुग्रीव नेरे, मडके व गोसावी यांनी काम पाहिले.
अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी
श्रीमती एस. एस. माने यांनी निकाल दिला.