धाराशिव – समय सारथी
गुटखा माफियाने धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्गसह काही भागात धुमाकूळ घातला असल्याचे नळदुर्ग पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर समोर आले आहे. गुटखा असलेली ट्रक लुटल्याच्या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला असुन लुटणारे सुद्धा माफियातील असल्याचे समोर आले आहे.
धाराशिव जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध गुटखा रॅकेटचा मास्टर माईंड असलेला ‘पंडीत’ कोण ? हा प्रश्न या निमित्ताने चर्चेला समोर आला आहे. काही जण त्याला या धंद्याची दिशा व दशा ठरविणारा ‘पंडीत’ समजतात तर काही जणांसाठी तो केवळ एक फक्त नाव असुन तो ‘मिस्टर इंडिया’ सारखा अदृश्य आहे.
मिस्टर इंडियासारखा अदृश्य असलेला तो कधी नांदेड, पुणे येथील असल्याचे सांगितले जाते मात्र कोणालाच त्याचा ठोस थांगपत्ता नाही. गुटखा माफियाने ‘वाळवी’ लावली असुन पद्याआडचा सुत्रधार असलेल्या या माफियाच्या अनेक ‘मोहित’ करणाऱ्या कथा आहेत.
नळदुर्ग पोलिसांनी धाडसी कारवाई करीत गुन्हा नोंद केला असून सध्या या भागात ट्रक लुटीचे प्रकार सर्रास होत असुन यात मोठी टोळी सक्रीय आहे. लुटीचा माल हा गुटखा किंवा अवैध असल्याने पोलिसात तक्रार करण्याचे धाडस कोणी करीत नाही त्यामुळे चोरावर मोर बनत ‘तेरी भी चुप मेरी भी चुप असा प्रकार होत आहे. मात्र नळदुर्ग पोलिसांच्या तपासात आता कारवाई होईल अशी अपेक्षा आहे.
उमरगा पोलिसांनी मोठी कारवाई करीत गुटखा बनविणाऱ्या टोळीचा व कारखाना भांडाफोड केला त्यानंतर हा माफिया रडारवर आला आहे.