बाप, खलनायक, डॉनसह अन्य उपाधी – कळंबचा मालक आला, रिल्सचा वर्षाव
धाराशिव – समय सारथी
परभणीनंतर धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात कोर्टाने नगरसेवक मोहसीन मिर्झा यांना सशर्त जामीन दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी कळंब शहरात जल्लोषात स्वागत केले. नगरसेवक मिर्झा यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर त्यांच्या कळंब शहर आगमना निमित्त जल्लोष करीत पोस्टचा वर्षाव केला. बाप, खलनायक, डॉनसह अन्य उपाधी देत कळंबचा मालक आला कळंब चालवायला यासह अन्य गाणी लावत रिल्सचा वर्षाव करण्यात आला.
आला तुमच्या सगळ्यांचा बाप आला, नायक नही खलनायक हू मैं, सगळं मार्केट आपलं आहे, बाप तो बाप रहेगा, जलवा तेरा जलवा, कळंबचा मालक आला कळंब चालवायला, कोणी नाही झाला पैदा रेकॉर्ड तोडायला या गाण्यासह किंग ऑफ कळंब, वाघ आला, आला भाई वापस, आला की बाप तुमचा वापस, डॉन बाप, दिलो में राज करता है, दादा का किरदार अशी घोषवाक्य टाकत स्वागत करण्यात आले, यामुळे कळंबचे वातावरण ढवळून निघाले.
ड्रग्ज सारख्या गुन्ह्यात सशर्त जामीन झाल्यानंतर स्वागत करण्याचा पॅटर्न या निमित्ताने कळंबकरासह जिल्ह्याला अनुभवायला मिळाला. पोलिस व जिल्हा प्रशासन या सगळ्या प्रकाराकडे शांतपणे पाहताना दिसत आहे तर लोकप्रतिनिधी व राजकीय नेतृत्व दुर्लक्ष करीत धन्यता मानत आहेत. रिल्समध्ये मिरवणुक, पोलिस गाडीतून बाहेर येताना व कोर्ट परिसरातील व्हिडिओ व इतर जुने नवे व्हिडिओ रिल्ससाठी वापरण्यात आले आहेत.
नगरसेवक मिर्झा यांना परभणी जिल्ह्यातील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात अटक करण्यात आली त्यानंतर कळंब येथील गुन्ह्यात आरोपी करून अटक करण्यात आली, पोलिसांनी कोर्टात पाठविलेल्या दोषारोप पत्रानुसार त्यांच्यावर ड्रग्ज विक्रीचा ठपका ठेवण्यात आला आहे. कळंब ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात 9 आरोपी असुन पोलिसांनी जवळपास दीड हजार पानांचे चार्जशीट दाखल केले आहे.
निखिल युवराज जाधव, अरविंद दादाराव कांबळे, लखन गायकवाड, मोहसीन सलीम मिर्झा व अनिस अमरोद्दीन तांबोळी या 5 जणांची जामीन झाली आहे तर 4 जण जेलमध्ये आहेत. धाराशिव पोलिस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शकील शेख हे तपास करीत असुन अन्य काही संशयित रडारवर आहेत. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख व सहायक सरकारी वकील ऍड आशिष कुलकर्णी यांनी कोर्टात बाजु मांडली.











