धाराशिव – समय सारथी
तुळजाभवानी देवीचा नवरात्र उत्सव सुरु असुन देवीच्या गाभाऱ्यात सोलापूर येथील एका गुन्हेगारी पार्शवभुमी असलेल्या मटका माफियाने दर्शन घेऊन फोटोसेशन केल्याने खळबळ उडाली आहे. सामान्य भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश बंदी असताना एका गुंडाला मात्र व्हीआयपी सेवा दिल्याने मंदीर संस्थानच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे. विशेष म्हणजे यावेळी विश्वस्त तथा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे स्वीय सहायक हे खास दिमतीला होते. या फोटो सोशलचे मीडियावर व्हायरल झाले आहेत, आमदारांचे पुन्हा एकदा माफियाबाबत झुकते माप दिसुन आले.
भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे कदम यांनी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलिसांनी अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार देऊन कारवाईची मागणी मागणी केली आहे. अमरराजे कदम यांनी तक्रारीसोबत फोटो सुद्धा दिले असुन मंदीर कारभार व व्हीआयपी दर्शन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. जिथे सामान्य भाविकांना दर्शनासाठी तास तास उभे राहावे लागते, प्रसंगी धक्काबुक्की सहन करावी लागते अश्या वेळी एका गुंडासाठी मात्र पायघड्या घातल्या जातात.
तुळजाभवानी देविजींचे फोटो मंदिर संस्थानकडून अधिकृत रित्या काढले जातात तथापि, श्री तुळजाभवानी देविजींचे फोटो तसेच व्हिडीओ कोणत्याही विधी दरम्यान किंवा इतर वेळी अन्य कोणीही वैयक्तिक रित्या काढु नयेत अन्यथा संबंधितांवर देवुळ कवायत कलम 24 व 25 अन्वये संबंधितावर कारवाई करण्यात येईल अशी नोटीस मंदीर व्यवस्थापक तहसीलदार माया माने यांनी काढली होती, त्यामुळे आता कोणावर व कधी कारवाई होते असा सवाल विचारला जात आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक, वारकरी, वृद्ध आणि सामान्य जनता तासनतास रांगेत उभी राहून अत्यंत श्रद्धेने नियमांचे पालन करत दर्शन घेतात. मात्र, दुसरीकडे काही प्रतिष्ठित व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींकडून मंदिराचे सर्व कायदे, संकेत आणि प्रोटोकॉल पायदळी तुडवले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे.
सोलापूर येथील सराईत तडीपारीसारखी कारवाई केलेले गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे अरुण प्रभाकर रोडगे उर्फ दादा रोडगे या मटका किंग बुक्कीमालकाने मंदिराचे सर्व नियम धाब्यावर बसवले. सदर व्यक्तीने महंत वाकोजीबुवा यांच्या मार्फत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे खाजगी सहायक सुधीर जमदाडे आणि नगराध्यक्ष विनोद पिटू गंगणे यांच्या मदतीने मंदिराच्या गाभाऱ्यात बेकायदेशीरपणे प्रवेश करून थेट देवीचे दर्शन घेतल्याचा आरोप केला आहे.
सामान्य भाविक तासनतास उन्हात रांगेत उभे असताना, अशा प्रकारे राजकीय व पदाचा गैरवापर करून वशिलेबाजीद्वारे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना थेट गाभाऱ्यात प्रवेश देणे हे अत्यंत निंदनीय, संतापजनक आणि धार्मिक भावना दुखावणारे आहे. या प्रकारामुळे मंदिर प्रशासनाची प्रतिमा मलीन होत असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र रोष पसरला आहे अशी प्रतिक्रिया यांनी व्यक्त केली.
पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून मंदिर नियमांचे उल्लंघन केले प्रकरणी चौकशी करावी. रोडगे यास कोणाच्या परवानगीने व कोणत्या अधिकाराखाली गाभाऱ्यात सोडण्यात आले. भविष्यात अशा प्रकारच्या व्हीआयपी वशिलेबाजीला आणि नियमबाह्य प्रवेशाला पूर्णपणे आळा घालावा, जेणेकरून सर्वसामान्य भाविकांना न्याय्य पद्धतीने व सुलभतेने दर्शन मिळू शकेल असे निवेदनात नमुद केले आहे.











