धाराशिव – समय सारथी
परभणी येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील आरोपी कळंब येथील नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा याच्यासह 6 आरोपींची परभणी जिल्हा कोर्टाने सशर्त जामीन मंजुर केला आहे. दरम्यान मिर्झा व गायकवाड हे कळंब ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात आरोपी असुन त्यांचा नियमित जामीन धाराशिव कोर्टाने नाकारला आहे. कळंब येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात रेवण नखाते व त्याला ड्रग्स पुरवठा करणारा कळंब शहरातील समता नगर येथील अनिस अमरोद्दीन तांबोळी या 2 आरोपीना 15 ऑक्टोबर पर्यंत वाढीव पोलिस कोठडी सुनावली आहे.

परभणी पोलिसांनी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखाली ड्रग्ज तस्करी करणाऱ्या आंतर जिल्हा टोळीचा पर्दाफाश केला. पोलिस हवालदार सयद उमर अमीन यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. सुरुवातीला अलीम शेख खाजा ( रा पाथरी, ) व शाहरुख फिरोजखान पठाण ( अंबाजोगाई बीड ) या 2 आरोपीना 14 लाख 63 हजार रुपयांच्या 72 ग्राम ड्रग्जसह 27 जुलै रोजी रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक दर्शन शिंदे हे याचा तपास करीत आहेत.
मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 365/2026 दाखल करून तपास करून 7 ऑगस्टला 6 आरोपीना अटक केली. त्यात कळंबचा नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा (रा. कळंब, जि. धाराशिव), अकीब अक्रम मोमीन (रा. बीड), बाबा मोमीन रफीक (रा. लातूर), सय्यद समीर सय्यद शब्बीर (रा. परळी वैजनाथ, जि. बीड), शेख सलमान शेख इरफान (रा. काकर मोहल्ला, परळी वैजनाथ) आणि अयान नासेर पठाण (रा. बरकत नगर, परळी वैजनाथ) यांचा समावेश होता.











