मुक्ती संग्राम दिनी आंदोलना ऐवजी त्याग, समर्पण आणि संघटनेचा सन्मान करूया
धाराशिव – समय सारथी
धाराशिवचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत, समाजाच्या भावनांशी निगडित असलेल्या सुमारे 150 फुटी भगव्या ध्वजाची उभारणी तसेच मराठा समाज मंदिराच्या उभारणीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे आता समाजाच्या प्रश्नांवर संघर्षाबरोबरच संवाद, विकास आणि प्रत्यक्ष कृतीला प्राधान्य देण्याची गरज आहे, असे मत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले.
धाराशिवमध्ये मराठा समाजाच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यासंदर्भात व्यक्त करण्यात आलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी समाजबांधवांना भावनिक आवाहन केले आहे.
“पालकमंत्री म्हणून धाराशिवमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतर मराठा समाजाच्या भावना आणि अपेक्षा माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाच्या राहिल्या आहेत. समाजाने मांडलेल्या मागण्यांपैकी भगवा ध्वज आणि मराठा समाज मंदिर या महत्त्वाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष काम सुरू केले आहे. हा केवळ विकासकामांचा विषय नाही, तर समाजाच्या भावनांचा सन्मान करण्याचा माझा प्रयत्न आहे,” असे सरनाईक यांनी म्हटल्याचे त्यांच्या भूमिकेत नमूद करण्यात आले आहे.
‘जरांगे-पाटलांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले; आता आम्ही बांधावर जाणार’
मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबरोबरच शेतकऱ्यांच्या अडचणी प्रभावीपणे मांडल्या आहेत, असे सांगत पालकमंत्री सरनाईक यांनी त्यांच्या शेतकरीविषयक भूमिकेचा संदर्भ दिला. “शेतकरी हा मराठवाड्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ कागदावर समजून घेऊन चालणार नाही; त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन त्या समजून घेतल्या पाहिजेत. जरांगे-पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत केलेल्या सूचनेनुसार आता मी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधीसह शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असून, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन मदतीसाठी प्रयत्न करणार आहे,” अशी भूमिका सरनाईक यांनी व्यक्त केली.
‘17 सप्टेंबर हा संघर्षाची कटुता वाढविण्याचा नव्हे, इतिहासाला अभिवादन करण्याचा दिवस’*
17 सप्टेंबर हा ‘ मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ‘ आहे. निजामाच्या राजवटीतून मराठवाड्याच्या मुक्तीसाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग, संघर्ष आणि बलिदानाचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे या ऐतिहासिक दिवशी समाजामध्ये कटुता निर्माण होईल किंवा सामाजिक वातावरणावर परिणाम होईल, अशा कोणत्याही कृती टाळण्याची गरज असल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साधेपणाने साजरा करण्यात यावा.
धाराशिव जिल्ह्यात सह संपूर्ण मराठवाड्यावर दुष्काळाचे गंभीर सावट आहे. अशा पाश्र्वभूमीवर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अत्यंत साधेपणाने कोणताही गाजावाजा न करता साजरा करावा असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. यावेळी कोणीही हार- तुरे, पुष्पगुच्छ आणून सत्कार करू नये तसेच फटाके अथवा इतर वाद्यांच्या गजरात कोणत्याही मिरवणूक काढू नयेत असे आवाहन देखील त्यांनी याप्रसंगी केले आहे.
“मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा कोणत्याही व्यक्तीचा किंवा पक्षाचा दिवस नाही. हा आपल्या पूर्वजांच्या त्यागाचा, समर्पणाचा आणि संघटित संघर्षाचा गौरवदिन आहे. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य अर्पण केले, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना आपण समाजात मतभेद आणि कटुता वाढविण्याऐवजी संवादाचे वातावरण ठेवले पाहिजे.
“मराठा समाजाच्या भावना मला समजतात. समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, धाराशिवची सामाजिक एकजूट आणि मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामाची गौरवशाली परंपरा अबाधित राहावी, हीच माझी मनापासून इच्छा आहे. त्यामुळे 17 सप्टेंबरच्या पवित्र दिवशी कोणताही गैरसमज किंवा कटुता निर्माण होऊ नये, यासाठी समाजबांधवांनी सहकार्य करावे,” असे आवाहन सरनाईक यांनी केले.
“भगवा ध्वज उंच फडकत राहावा, समाजाचे मंदिर ज्ञान, एकता आणि सामाजिक कार्याचे केंद्र बनावे आणि शेतकऱ्याच्या बांधावर शासन पोहोचावे—हीच धाराशिवच्या विकासाची दिशा असावी,” अशी भूमिका पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. मराठा समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेण्यास आणि जिल्ह्यातील शेतकरी, युवक, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करण्यास आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.










