धाराशिव – समय सारथी
एका महिलेने आपल्या तीन लहान मुलांसह उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नळदुर्ग येथील किल्ल्यात घडली आहे. या भीषण दुर्घटनेत आईसह एका चिमुकल्या मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील वंताळा येथील रहिवासी असलेल्या अश्विनी तानाजी मोहिते (वय 30) या गुरुवारी आपल्या तीन लहान मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावर आल्या होत्या. किल्ल्याच्या उंच तटबंदीवरून त्यांनी अचानक तिन्ही मुलांना सोबत घेऊन खाली उडी घेतली. किल्ल्याच्या अत्यंत उंच भागावरून खाली पडल्यामुळे मोठा आवाज झाला.
दुर्घटनेत आई अश्विनी मोहिते आणि त्यांच्या एका मुलाचा गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर दोन्ही मुलींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना धाराशिव येथे हलवण्यात आले असुन त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.











