धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर नंतर कळंब येथे ड्रग्ज सापडल्यानंतर खळबळ उडाली असुन पोलिस तपासात 5 आरोपी निष्पन्न झाले आहेत त्यातील 4 जणांना अटक केली आहे तर 2 जण जेलमध्ये, 2 जण पोलीस कोठडीत आहेत. परभणी ड्रग्ज गुन्ह्यात नगरसेवक मिर्झा याला अटक केली आहे. ड्रग्जबाबत पालकमंत्री सरनाईक यांनी भुमिका स्पष्ट करीत पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिले. राजकीय नेत्यांची सुद्धा नैतिक जबाबदारी आहे , गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचुन काढा. ड्रग्ज हे विष असुन राजकारणापेक्षा समाजहीत पहा असे म्हणत त्यांनी पाठबळ देणाऱ्या नेत्यांचे पालकमंत्री सरनाईक यांनी कान टोचले.
कळंब येथे शिवसेना उबाठा गटाच्या काही लोकप्रतिनिधी यांना ड्रग्जमध्ये पकडले आहे त्यानंतर त्यांनी राजकीय सारवासारव करण्यासाठी त्यांना पक्षातून काढून टाकले. सहकारी असे करीत असेल तर तुमची सुद्धा तितकी नैतिक जबाबदारी आहे. तुमच्या पक्षाचा प्रतिनिधी ड्रगजचे सेवन, विक्री करीत असेल तर तुमची सुद्धा तितकी नैतिक जबादारी आहे. एखाद्या पक्षाचा लोकप्रतिनिधी पकडला म्हणुन मी बोलत नाही, पोलिसांनी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. काळाची गरज आहे, तुळजापूरच्या बाबतीत सुद्धा असेच घडले, मुंबई पर्यंत धागेदोरे सापडले.
ड्रग्जच्या माध्यमातून ज्या काही गुन्हेगारी प्रवृत्ती ह्या जिल्ह्यात असतील त्यांना ताबडतोब कुठलेही अभय न देता कारवाई करावी. कोणत्याही पक्षाचा किंवा कोणाचाही वरदहस्त असला तरी त्याला तात्काळ तुरुंगात टाकून कठोरात कठोर कारवाई करा, अश्या सुचना त्यांनी पोलीस अधीक्षक रितु खोखर यांना दिल्या आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी जे जे काही करावे लागेल ते करा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री हे पोलिसांच्या सोबत आहेत, त्यांनी कठोर कारवाई करावी.
भाजप, शिवसेना, उबाठा किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी किंवा कार्यकर्ते ड्रग्जमध्ये असतील त्याला मदत करणारे नेते यांना तुरुंगात टाका, हयगय करू नका. ड्रग्ज विक्री हे तरुण पिढीला बरबाद करण्यासारखे आहे, तरुण पिढी वाचवायची असेल तर त्यांना तुरुंगाची हवा खावीच लागेल. ड्रग्ज हे विष आहे, राजकीय फायदा पाहण्यापेक्षा समाजाचा फायदा पहा, लहान मुले, तरुण भविष्यात बरबाद होतील त्यांचा फायदा पहा, त्यामुळे अशा लोकांना सहकार्य करू नका असे आवाहन सरनाईक यांनी राजकीय नेत्यांना केले.
ड्रग्जच्या बाबतीत मुख्यमंत्री हे फार कठोर आहेत, मकोका कायद्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे, नार्कोटिक्सच्या अनुषंगाने काही कायदे कमकुवत असतील तर ते सुधारले जातील. कॅबिनेट बैठकीत याची चर्चा झाली आहे. ड्रग्जमधील गुन्हेगाराना मकोका पेक्षा गंभीर कारवाई करू असे पालकमंत्री म्हणाले.












