धाराशिव – समय सारथी
“विस्ताराला मर्यादा नसते, परंतु महत्त्वाकांक्षा संतुलित असावी लागते…” भाजपा परिवाराची पार्टी नाही, पार्टी हाच आमचा परिवार ! जय भाजपा… तय भाजपा… अशी पोस्ट भाजपचे नेते माजी आमदार सुजिसिंह ठाकूर यांनी सोशल मीडियावर केली आहे. मागील काही दिवसापासून भाजपात सुरु असलेला जुना नवा असा अंतर्गत वादाचा वणवा अजूनही तसाच आहे.
प्रदेश कार्यकारीणी सदस्य ऍड अनिल काळे यांना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या भेटीपासून रोखल्यानंतर हा वाद सुरु झाला. जुना नवा वादात ऍड अनिल काळे, माजी जिल्हाध्यक्ष संताजी काका चालुक्य, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍड व्यंकटराव गुंड, रामदास कोळगे यांनी तिखट प्रतिक्रिया दिल्यानंतर त्याला आमदार पाटील यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना ताई पाटील यांनी प्रतिउत्तर देत आव्हान देत काही प्रश्न विचारले, त्यावर ठाकूर यांनी यापुर्वी देखील प्रतिउत्तर दिले होते पुन्हा आज त्यांनी उत्तर दिले आहे.
मागील 30 वर्षांमध्ये भाजपच्या पक्ष संघटन बांधणीसाठी किंवा पक्ष वाढीसाठी आपले काय योगदान आहे हे उदाहरणासह संदर्भ स्पष्टीकरण द्यावे असे आव्हान अर्चना पाटील यांनी केले होते. तुमच्या कार्यकाळामध्ये तुमच्या कार्यकारिणीमध्ये कोणत्याही एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेवरती भारतीय जनता पार्टीची सत्ता होती असे दाखवून द्यावे. विनाकारण एखाद्या वरती हेतूपुरस्कर आरोप किंवा निंदा करू नये. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यामुळे सत्ता मिळते असा दावा पाटील यांनी केला होता.
30 वर्षे निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांनी काय केलं, असा प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी स्वतःचा राजकीय प्रवास आठवावा. ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून भाजप गावागावात पोहोचवला, त्याच कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळे अनेकांना स्वतःचा पक्ष सोडून भाजपमध्ये यावे लागले. भाजपमध्ये येण्याची वेळ तुमच्यावर आली, हेच त्या जुन्या कार्यकर्त्यांच्या 30 वर्षांच्या संघर्षाचं आणि निष्ठेचं सर्वात मोठं उत्तर आहे. संघर्ष केलेल्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांच्या त्यागाचा सन्मान करायला शिका. कारण पक्षाची पायाभरणी करणारे कार्यकर्ते नसते, तर आज भाजपमध्ये येण्याची संधीही निर्माण झाली नसती. ताई साहेब…. अशी पोस्ट ठाकूर यांनी करीत काही प्रश्न उपस्थितीत केले आहेत.












