धाराशिव – समय सारथीतुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात तामलवाडी पोलिसांनी 3 आजी माजी नगराध्यक्ष, 1 सभापतीसह अन्य आरोपी विरोधात तब्बल 4 हजार 582 पानांचे दोषारोप पत्र धाराशिव कोर्टात सादर केले. मुंबई येथील वैभव गोळे व नळदुर्ग येथील इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकूर या दोघांना फरार दाखवण्यात आले आहे. हे दोघे फेब्रुवारी 25 पासुन जवळपास 16 महिन्यापासुन फरार आहेत. गोळे हा हाताशी आलेला असताना निसटला तर ठाकूर या नळदुर्ग भागात काही काळ खुलेआम फिरत असतानाही त्याला पकडले नाही.
ड्रग्ज तस्करीत 4 आरोपीना 14 फेब्रुवारी 2025 ला रंगेहात अटक केल्यानंतर तपासात मुंबई येथील संगीता गोळे हिचे नाव निष्पन्न झाले, तिला 22 फेब्रुवारीला मुंबई येथील अटक करण्यात आली. तीच्या अटकेची माहिती पती वैभव गोळे याला देण्यात आली, पंचनामा व त्यावर त्यावर गोळेच्या सह्या घेतल्या. 23 फेब्रुवारीला कोर्टात रिमांड दाखल करते वेळी पोलिसांनी वैभव गोळेसह त्याच्या परिवारावर दाखल असलेल्या ड्रग्ज तस्करी व इतर गुन्ह्यांची जंत्री दिली. तपासात वैभव गोळेचे नाव निष्पन्न झाले, 28 फेब्रुवारीला कोर्टात पोलिसांनी तो संशयित आरोपी असल्याचे सांगितले मात्र तो पर्यंत वैभव गोळे फरार झाला, तो आजवर पोलिसांच्या हाती सापडलाच नाही.
एकीकडे आरोपींची नावे निष्पन्न होत तपासात प्रगती होत होती. माजी नगराध्यक्षसह अनेक राजकीय नेत्यांची नावे आरोपी म्हणुन समोर आली, त्यांना अटकही झाली मात्र नळदुर्ग येथील इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकूर याला पोलिस दोषारोप पत्र दाखल करेपर्यंत अटक करू शकले नाहीत. ठाकूर याने जिल्हा कोर्ट ते उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट असा जामीनासाठी प्रयत्न केला मात्र त्याला जामीन व दिलासा मिळाला नाही. तो गेली 16 महिने कागदोपत्री फरार राहण्यात यशस्वी ठरला.
मुंबई, पूणे, सोलापूर येथुन आरोपीना पोलिसांनी अटक केली मात्र नळदुर्ग येथे खुलेआम वावर असेल्या ठाकूर याला अटक करू शकले नाहीत. दरम्यानच्या काळात नळदुर्ग येथे पोलिसांनी 33 लाखांचा मुद्देमाल असलेला गुटखा गाडी पकडली त्यावेळी ठाकूर तिथे आला व त्याने पोलिसांना शिवीगाळ करून सहीसलामत निघुन गेला. त्याच्यासह 4 जणां विरोधात गुन्हा नोंद झाला त्यातही जिल्हा कोर्टाने ठाकूर याचा जामीन नाकारला आहे. सध्या तो ड्रग्ज व गुटखा तस्करी या दोन्ही गुन्ह्यात फरार आहे.
3 वेगवेगळ्या कारवाईत 64 ग्रॅम वजन असलेल्या ड्रग्जच्या 89 पुड्या जप्त करीत 39 आरोपींचा छडा लावत धाराशिव पोलिसांनी विक्रम केला, तो कौतुकास्पद आहे. मुळ व पुरवणी असे तब्बल 15 हजार पानांचे राज्यातील विक्रमी दोषारोप पत्र दाखल केले मात्र 2 आरोपीना ते अटक करू शकले नाहीत. पोलिसांचा तपास व शोध सुरु असुन आरोपीना अटक व भारतीय नागरी सुरक्षा संहिता 193(9) प्रमाणे पुरवणी दोषारोप पत्राची तजवीज ठेवली आहे.












