धाराशिव – समय सारथी
खरीप २०२५ हंगामातील पीक विम्यासंदर्भात मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला पेच अखेर सुटला आहे. कृषी विभाग आणि राज्य सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून धाराशिव जिल्ह्यातील ४ लाख ५ हजार ४४ शेतकऱ्यांना सुमारे ३३६ कोटी ४६ लाख रुपयांचा पीकविमा वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विमा कंपनीने घेतलेले तांत्रिक आक्षेप राज्यस्तरीय समितीने (STAC) फेटाळून लावल्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम जमा होण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
धाराशिव जिल्ह्यासाठी खरीप २०२५ अंतर्गत आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड ही विमा कंपनी कार्यरत आहे. जिल्ह्यातील ५५ विमा युनिटमधील ३६८ पीक कापणी प्रयोगांवर कंपनीने आक्षेप नोंदवून अपील केले होते. कंपनीचा दावा होता की, पीक कापणी प्रयोगाची प्रक्रिया नियमानुसार झालेली नाही. मात्र, धाराशिव जिल्हाधिकारी स्तरावर हे आक्षेप आधीच फेटाळण्यात आले होते. तरीही कंपनीने राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे (STAC) धाव घेतली होती. आपण स्वतः या प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालून कृषी विभागाचे प्रधान सचिव परिमल सिंग यांची भेट घेतली. सिंग इतर राज्यातील निवडणूक कर्तव्यावर असतानाही शेतकऱ्यांची निकड ओळखून त्यांनी ऑनलाईन सुनावणी घेतली. या सुनावणीत विमा कंपनीचे आक्षेप पुराव्याअभावी फेटाळून लावत जिल्हा समितीने २२ डिसेंबर रोजी घेतलेला निर्णय कायम ठेवला. परिणामी, कृषी आयुक्तालयाने आता पात्र शेतकऱ्यांचे दावे तात्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील ४ लाख ५ हजार ४४ शेतकरी बांधवांना सुमारे ३३६ कोटी ४६ लाख रुपयांचा पीकविमा वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
संकटकाळात आधार देणे हेच आपले कर्तव्य : आमदार राणाजगजितसिंह पाटील
जिल्ह्यात सोयाबीन हे मुख्य पीक असून, सर्वाधिक ४ लाख ४० हजार ४४ अर्जदारांनी सोयाबीनचा विमा उतरवला होता. यातील ४.०५ लाख शेतकऱ्यांना ३३६ कोटींचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळावे यासाठी आपण शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. विमा कंपनीने तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेत दिलेली स्थगिती आता उठली आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना लवकरच हा दिलासा मिळेल. बळीराजाला संकटकाळात आधार देणे हेच आपले कर्तव्य असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना ५२४ कोटींची मदत
केवळ पीकविमाच नव्हे, तर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या ७ लाख १३ हजार ८७१ शेतकरी बांधवांना शासनाकडून ५२४ कोटी ७८ लाख रुपयांची मदत यापूर्वीच वितरित करण्यात आली आहे. यामध्ये ५ लाख ७५ हजार ७४४ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचा समावेश आहे. त्यानुसार जून महिन्यातील नुकसानीपोटी २२ लाख रुपयांची मदत (१०८६ लाभार्थी), जुलै-ऑगस्ट २०२५ मधील नुकसानीच्या मोबदल्यात १८९ कोटी ६१ लाख रुपये (२.३३ लाख लाभार्थी), सप्टेंबर २०२५ मधील नुकसानीचे २९२ कोटी ४९ लाख रुपये (४.०४ लाख लाभार्थी) तर सप्टेंबर महिन्यातील अतिरिक्त नुकसानीचे ४२ कोटी ४६ लाख रुपये (६३ हजार लाभार्थी) आपल्या महायुती सरकारने बळीराजाला दिलासा देण्यासाठी त्यांच्या खात्यात जमा केले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.












