धाराशिव – समय सारथी
जमिनीच्या वादातुन काकाने पुतण्याचा खुन केल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे घडली आहे. चुलत्यानेच पुतण्याचा चाकूने भोसकून खून केला. सुजित शेळके असे मृत पुतण्याचे नाव असुन तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता.
विलास शिवाजी शेळके हा आपल्या आई-वडिलांशी जमिनीच्या वादावरून वाद घालत त्यांना मारहाण करत होते. ही बाब पाहून त्याचा पुतण्या सुजित ज्ञानेश्वर शेळके हा आजी-आजोबांना वाचवण्यासाठी मध्ये पडला. यावेळी तुला जमीन देणार नाही, तू जास्त माजलास अशी धमकी देत विलास शेळके यांनी सुजितवर चाकूने वार केला. गंभीर जखमी झालेल्या सुजितचा जागीच मृत्यू झाला.
मृताची आई मनीषा शेळके यांच्या फिर्यादीवरून शिराढोण पोलिस ठाण्यात आरोपी विलास शेळके याच्याविरुद्ध गुन्हा खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घडलेल्या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक धरणीधर कोळेकर व पोलिस उपनिरीक्षक चोपणे करत आहेत.











