धाराशिव – समय सारथी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाराशिव येथील दौऱ्या दरम्यान गोंधळ घालुन शिवसेनेत फुट पाडण्याचा कट रचला गेला होता, गोंधळ घालण्याचे मेसेज पाठवण्यात आले याची टीप पोलिसांना मिळाल्यावर काही शिवसैनिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन स्थानबद्ध, नजरकैदेत ठेवले गेले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे सविस्तर अहवाल सादर केला जाणार असुन त्यात सहभागी लोकांवर कारवाई करण्याचे संकेत सरनाईक यांनी दिले.
शिंदे यांचे धाराशिव येथे पत्रकार पुरस्कार वितरण व शिवसेना पदाधिकारी मेळावा असे 2 कार्यक्रम होते. या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा काही जणांचा डाव होता तसा त्यांनी कट रचला असल्याचा दावा केला जात आहे. कार्यक्रमापूर्वीच या कटाचा सुगावा पोलिसांना लागला त्यानंतर संशयितांची धरपकड केली. आता शिंदें व पालकमंत्री सरनाईक यांनी पोलिसांकडून या घटनेचा, कटाचा अहवाल मागवला असल्याची माहिती आहे.
शिंदें पुढे अन्याय झाल्याचा पाढा वाचायचा आणि भावनाविवश झालेल्या कार्यकर्त्यांच्या असंतोषाला खतपाणी घालून शिवसेनेत फूट पाडायची, असा कट रचल्याचा दावा केला जात आहे, तसे मेसेज सुद्धा काही जणांनी पाठवले होते. कोणत्या शिवसैनिकांचा समावेश होता हे अद्याप स्पष्ट झाले नाही. कुणावर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय देण्याची भूमिका शिंदेंची आहे, त्यामुळे शिवसैनिकांनी अपप्रचाराला बळी पडू नये, असे सरनाईक म्हणाले.
शिवसेनेचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते हे खासदार श्रीकांत शिंदे यांची सोलापूर येथे भेट घेऊन आपली व्यथा मांडणार आहेत. आगामी काळात धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











