धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी बैठक बोलावली आहे. गुरुवारी 10 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनात ही बैठक पार पडणार आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा, मुख्यमंत्री शेतकरी सौर पंप योजना, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, तसेच जलसंपदा, मृद व जलसंधारण विभाग, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना आणि जलजीवन मिशन अंतर्गत पाणी टंचाई या महत्त्वाच्या विषयांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.
या बैठकीसाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), पोलीस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग, मृद व जलसंधारण अधिकारी, कृषी अधिकारी, नियोजन अधिकारी तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सदर बैठकीत संबंधित विभागांनी आपल्या विषयांवरील अद्ययावत माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, बैठकीनंतर तात्काळ कार्यवाही अहवाल सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.











