धाराशिव – समय सारथी
नळदुर्ग येथील गुटखा तस्करी व शासकीय कामात अडथळा करीत पोलिसांना धमकी दिल्याच्या गुन्ह्यात 3 आरोपीना अटक करण्यात आली असुन त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकूर हा आरोपी फरार असुन पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
गुन्ह्यातील 3 आरोपी बीड जिल्ह्यातील आष्टी मतदार संघातील पाटोदा येथील असुन तिथे मोठ्या प्रमाणात यांच्यामार्फत तस्करी केली जात असल्याचा संशय आहे त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपीवर मकोका लावावा व सखोल तपास करून रॅकेटचा म्होरक्याला अटक करावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे, याबाबत ते विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवणार आहेत. या तस्करीचे पाळे मुळे खोलवर रुजली असुन यात अनेकांचा सहभाग पोलिस तपासात उघड होऊ शकतो.
संजय सुभाष जगताप ( वानेवाडी ता पाटोदा) सचिन परमेश्वर पवार ( रा.कुसळंब ता पाटोदा ) सतीश तुकाराम सोंडगे ( गवळवाडी ता पाटोदा जि. बीड) या 3 आरोपीना अटक केली असुन इतर आरोपी व या रॅकेटचा शोध सुरु आहे. नळदुर्ग हा गुटखासह इतर तस्करीसाठी महत्वाचा मार्ग असुन इथे काही जन गाड्या पास करण्याचे व त्यांना संरक्षण देण्याचे काम करतात. ठाकूर हा ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात 14 फेब्रुवारी 25 पासून गेली 1 वर्षांपेक्षा अधिक काळापासून फरार आहे.
नळदुर्ग येथे पोलिस गुटखा तस्करावर कारवाई करीत असताना तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील फरार पाहिजे असलेला आरोपी मिटू ठाकूर हा त्याच्या सहकाऱ्यासोबत आला व तुम्ही गाडी कशी काय पकडली, गाडी सोडून दे नाहीतर तुला बघतो अशी धमकी दिली व शासकीय कामात अडथळा निर्माण करून सहीसलामत निघून गेला. याप्रकरणी दत्तात्रय कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ठाकूरसह 4 जणांवर भारतीय न्याय संहिता कलम 132, 223,274,275, 123, 45, 3(5) सह कलम 59 अन्न सुरक्षा व मानके कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
निसर्ग हॉटेल जवळ नळदुर्ग बायपास रोड येथे कुंभार हे त्याचे स्टाफ सोबत शासकीय कामकाज करत असताना आरोपींनी त्यांचे ताब्यातील आयशर टॅम्पो क्र एमएच 16 सीडी 2395 मध्ये महाराष्ट्र शासनाचे प्रतिबंधीत केलेला व मानवि आरोग्यास हानिकारक असलेला गोवा गुटख्याची तस्करी करीत होते. गोवा गुटख्याच्या 50 मोठ्या गोण्या, आयशर टॅम्पो, स्विफट कार, तीन मोबाईल असा 48 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.












