धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील फरार पाहिजे असलेला आरोपी इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकूर याची दबंगगिरी पाहायला मिळाली आहे. नळदुर्ग येथे पोलिस गुटखा तस्करावर कारवाई करीत असताना ठाकूर हा त्याच्या सहकाऱ्यासोबत आला व तुम्ही गाडी कशी काय पकडली, गाडी सोडून दे नाहीतर तुला बघतो अशी धमकी दिली व शासकीय कामात अडथळा निर्माण करून सहीसलामत निघून गेला. याप्रकरणी दत्तात्रय कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ठाकूरसह 4 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ठाकूर हा ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात गेली 1 वर्षांपासून फरार आहे, धाराशिव पोलिसांनी 14 फेब्रुवारी 2025 रोजी कारवाई करून गुन्हा नोंद केला तेव्हापासून तो फरार आहे, तो खुलेआम फिरत असतानाही पोलिसांनी पकडण्याचे धाडस न दाखवल्याने त्याची हिम्मत वाढली आणि तो पोलिसांवरच वरचढ ठरला. एकीकडे ठाकूर पोलिसांना कागदोपत्री सापडत नसताना त्याची दबंगगिरी समोर आली आहे.
गुटखा माफियाला अभय देत त्यांना वाचवण्यासाठी ठाकूर हा तिथे आला आणि पोलिसाला धमकावू लागला, शेवटी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त येण्याची चाहूल लागताच तो फरार झाला. ठाकूर याच्यावर दाखल गुन्ह्याची जंत्री मोठी असुन त्याची या भागात दहशत असतानाच ही घटना घडल्याने या भागातील पोलिसांचे मनोबल खचले आहे. या भाईच्या मुसक्या पोलिस कधी आवळणार हे पाहावे लागेल.
संजय सुभाष जगताप ( वानेवाडी ता पाटोदा) सचिन परमेश्वर पवर ( रा.कुसळंब ता पाटोदा ) सतीश तुकाराम सोंडगे ( गवळवाडी ता पाटोदा जि. बीड) व मिट्टू उर्फ इंद्रजितसिंग रणजितसिंग ठाकुर, रा नळदुर्ग या 4 जणांवर भारतीय न्याय संहिता कलम 132, 223,274,275, 123, 45, 3(5) सह कलम 59 अन्न सुरक्षा व मानके कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
निसर्ग हॉटेल जवळ नळदुर्ग बायपास रोड येथे कुंभार हे त्याचे स्टाफ सोबत शासकीय कामकाज करत असताना आरोपींनी त्यांचे ताब्यातील आयशर टॅम्पो क्र एमएच 16 सीडी 2395 मध्ये महाराष्ट्र शासनाचे प्रतिबंधीत केलेला व मानवि आरोग्यास हानिकारक असलेला गोवा गुटख्याची तस्करी करीत होते. गोवा गुटख्याच्या 50 मोठ्या गोण्या, आयशर टॅम्पो, स्विफट कार, तीन मोबाईल असा 48 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
दरम्यान ड्रग्ज तस्करी गुन्ह्याचा तपास सुरु असुन त्यात अतिरिक्त दोषारोपपत्र अद्याप कोर्टात सादर झालेले नाही. धाराशिव पोलिस दलात एक से बढकर एक अधिकारी व त्यांची टीम असतानाही ठाकूर ड्रग्ज गुन्ह्यात सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ठाकूरला अभय देणारा पाठीराखा कोण ? याचीही चर्चा यानिमित्ताने होत आहे. ड्रग्ज तस्करीत तुळजापूर नगराध्यक्ष विनोद उर्फ पिटू भाई गंगणे यांच्यासह अन्य 36 आरोपीना पोलिसांनी शिताफिने पकडले मात्र ठाकूरबाबत हात आखाडते घेतले, असा वेगळा न्याय का ? याची चर्चा रंगू लागली आहे.











