3 तपास यंत्रणा, 9 आरोपी, 128 साक्षीदार, 16 महिने कट – 25 लाखांची सुपारी, 2 शुटर व परदेशी शस्त्र, 14 वर्ष सुनावणी
धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडात पुढील सुनावणी 20 एप्रिल रोजी होणार असुन या तारखेला सर्व आरोपीना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हत्याकांडात साक्ष, पुरावे व युक्तीवाद अशी सुनावणी प्रक्रिया संपली आहे. निकाल जाहीर करण्यापूर्वी सर्व आरोपींची कोर्टात प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक आहे, जेणेकरून निकालाची तारीख जाहीर करता येईल असे कोर्टाने म्हणटले.
24 मार्चच्या सुनावणीवेळी काही आरोपी गैरहजर होते, त्यांना हजर राहण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली. मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांच्यासमोर सुनावणी होत आहे. काही आरोपी विविध कारणांमुळे अनुपस्थित होते, त्यांना तंबी देत हजर राहण्याचे आदेश दिले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने याची फास्ट ट्रॅक सुनावणी असुन वेळेत निकाल द्यावा असे आदेश कोर्टाने दिले आहेट त्यामुळे पुढील सुनावणीला सर्व आरोपी हजर राहिल्यास निकालाची तारीख जाहीर होऊ शकते.
हत्याकांडातील शूटर पिंटू सिंह उर्फ महात्मा चौधरी याला बिहारमधील सिवान कारागृहातून न्यायालयात हजर करण्यात आले मात्र पुढील सुनावणीवेळी प्रत्यक्ष हजर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संशयीत आरोपी सतीश मंदाडे, दिनेश तिवारी, राज्य उत्पादन शुल्क विभागातील पोलिस निरीक्षक शशिकांत कुलकर्णी हे 3 आरोपी हजर होते तर मुख्य आरोपी डॉ पद्मसिंह पाटील, मोहन शुक्ला, माफीचा साक्षीदार पारसमल जैन बादला, कैलाश यादव, छोटू पांडे हे 5 आरोपी गैरहजर होते त्यांच्या वतीने गैरहजेरी माफीसाठी अर्ज दाखल केला, ज्यावर न्यायालयाने शेवटची संधी देत अर्ज मंजूर केला.
आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांच्या वतीने ऍड पी एम गवाड हे हजर होते तर डॉ पाटील यांच्या वतीने ऍड भुषण महाडिक, ऍड रोहित मालपाणी हे तर इतरांच्या वतीने ऍड नेहा सुळे बाजु मांडत आहेत. 4 जुलै 2011 पासुन सुमारे 14 वर्षापासुन या दुहेरी खुन खटल्याची सुनावणी सुरु आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदार यांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. डॉ पाटील. यांच्या वतीने 1 हजार 250 पानाचे लेखी म्हणणे मांडले आहे. डॉ पाटील हे सध्या सक्रीय राजकारणापासुन अलिप्त आहेत.
पवनराजे यांची हत्या करण्यासाठी पारसमलने फेब्रुवारी 2005 मध्ये लातुर येथे जाऊन त्यांच्या घरी रेकी केली त्यानंतर तो धाराशिवला आला मात्र डाव फसल्याने तब्बल 16 महिने कट रचून, पाळत ठेवून 3 जुन 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांची कळंबोली येथे हत्या करण्यात आली. सुरुवातिला महाराष्ट्र पोलिस, त्यानंतर सीआयडी यांनी तपास केला मात्र कोणतेही धागेदोरे हाती न आल्याने आंदोलन, मोर्चे काढण्यात आले. पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी राजे निंबाळकर यांनी कोर्टात याचिका दाखल केली त्यानंतर सीबीआयने तपास केला. हत्याकांड नंतर 3 वर्षांनी 6 जुन 2009 रोजी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांना खासदार पदावर असताना सीबीआयने अटक केली.
कै पवनराजे यांची हत्या ज्या शस्त्रानी केली होती ती शस्त्र परदेशी बनावटीची होती त्या बंदुकीवर मेड इन युएसए, चायना असे लिहले होते. पवनराजे यांची हत्या केल्यानंतर कोणताही पुरावा व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार राहू नये म्हणुन हल्लेखोर असलेल्या 2 शूटरनी समद काझी यांना सुद्धा एक गोळी मारली, गोळी आरपार गेल्याने दोघांचाही जागेवरच मृत्यु झाला. पवनराजे यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी डोक्यात लागली तर काझी यांच्यावर एक गोळी झाडली.
राजकीय कारकीर्द व अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांनी कट रचत 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचा ठपका सीबीआयने दोषारोपपत्रात ठेवला आहे. माजी गृहमंत्री तथा माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील, पारसमल जैन बादला, शुटर दिनेश तिवारी, मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, लातुर येथील सतीश मंदाडे, शुटर पिंटू सिंग, उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे हे 9 जण दुहेरी हत्याकांडात संशयित आरोपी आहेत.











