धाराशिव – समय सारथी
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) यांच्या इयत्ता आठवीच्या सामाजिक विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातून सन 1759 मधील मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा वगळण्यात किंवा कमी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज, धाराशिव यांच्या वतीने संबंधित नकाशा पुन्हा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, संबंधित नकाशामध्ये मराठा साम्राज्याचे उत्तरेतील पेशावरपासून ते दक्षिणेतील तंजावरपर्यंत असलेले वर्चस्व ऐतिहासिक संदर्भासह स्पष्टपणे दर्शविण्यात आले होते. मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतिनिधित्व करणारा हा नकाशा विद्यार्थ्यांना त्या व भौगोलिक काळातील राजकीय परिस्थिती समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. मात्र कोणताही ठोस व शास्त्रीय पुरावा न देता हा नकाशा अभ्यासक्रमातून वगळण्यात किंवा त्यामध्ये कपात करण्यात आल्याची बाब समोर आली असून, संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनीही याबाबत स्पष्ट कारण नसल्याचे मान्य केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रख्यात इतिहासकारांचा समावेश असलेली तज्ञ समिती तात्काळ गठीत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर समितीमार्फत वस्तुनिष्ठ व ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे या विषयाचा पुनर्विचार करून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा संबंधित नकाशा पुन्हा इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर सचिन पडवळ, उमेश मगर, अक्षय नाईकवाडी, सागर घाडगे, अतुल पडवळ, महेश गोडसे, संकेत सुर्यवंशी, मुकुंद घाडगे, मनोज मोरे, ऍड अंजिक्य मगर, निलेश साळुंके यांच्या स्वाक्षरी आहे.











