जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र
धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स कार्यक्रम” अंतर्गत करण्यात आलेल्या मूल्यमापनात धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात तृतीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी मंत्री आशिष शेलार उपस्थित होते.
या उपक्रमात कार्यालयातील संगणकीकरण, आपले सरकार पोर्टल, ई-ऑफिस प्रणाली, कागदविरहित कामकाज, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. या सर्व बाबींमध्ये धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यातील 36 जिल्ह्यांमधून अव्वल तीनमध्ये स्थान मिळवले.
ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांना या यशामुळे नवी दाद मिळाल्याचे मत व्यक्त होत आहे.












