धाराशिव – समय सारथी
भारत सरकारच्या विकास धोरणांतर्गत धाराशिव ते बीड ते छत्रपती संभाजीनगर यांना जोडणारा नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला असून, हा प्रकल्प मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. 27 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी, बीड यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून प्रकल्पाची गती वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या रेल्वे मार्गामुळे नागरिकांना जलद, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. तसेच औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रांना चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकासासाठी ग्रामीण व शहरी भागांमधील संपर्क अधिक सुलभ होणार आहे.
प्रस्तावित मार्गासाठी काही ठिकाणी खाजगी जमीन संपादन करण्यात येणार असून, वनविभाग व इतर विभागांच्या जमिनींचाही समावेश असणार आहे. सर्व संबंधित विभागांच्या सहभागातून या प्रक्रियेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. एकात्मिक नियोजन व प्रशासनाच्या प्रयत्नांतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येईल, अशी अपेक्षा आहे.











