धाराशिव – समय सारथी
चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खुन केल्याप्रकरणी पतीस कोर्टाने जन्मठेपेची व 30 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. वाहीद बिलाल कुरेशी असे आरोपीचे नाव असुन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अभिश्री देव यांनी जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी केलेला युक्तिवाद, सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे शिक्षा सुनावली. आरोपीने स्वतःवर सुद्धा वार केले होते, या प्रकरणात एका लहान मुलाची साक्ष महत्वाची ठरली.
फिर्यादी ही आपल्या कुटुंबासह नळदुर्ग येथे वास्तव्यास आहेत, त्यांच्या बहिणी सुलताना हिचे पती आरोपी वाहीद बिलाल कुरेशी हे तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार भांडण व मारहाण करीत असत. 4 नोव्हेंबर 2024 रोजी सुलताना ही हैदराबाद येथे नातेवाईकांकडे गेली होती. नंतर नातेवाईकांनी समजावून सांगितल्यावर आरोपीने तिला परत नळदुर्ग येथे आणले.5 नोव्हेंबर रोजी सुलताना हिच्या चहाच्या टपरीवर आरोपी व तिच्यात वाद सुरू असताना आरोपीने चाकू व कात्रीने तिच्यावर वार करून गंभीर जखमी केले. यात सुलताना हिचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी फिर्यादी गेली असता आरोपीने धमकी दिली व स्वतःवरही चाकूने वार करून जखमी झाला. त्यानंतर आरोपीस तात्काळ उपचारासाठी नळदुर्ग येथील शासकीय रुग्णालयात व पुढे सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.या प्रकरणी पोलीस स्टेशन नळदुर्ग येथे भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक आय आर नांगरे यांनी घटनास्थळ पंचनामा करून चाकू, कात्री व रक्ताचे नमुने जप्त केले. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. पी. सोळुके यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्यात अभियोग पक्षातर्फे जिल्हा शासकीय अभियोक्ता महेंद्र बी. देशमुख यांनी एकूण १२ साक्षीदार तपासले. विशेषतः बाल साक्षीदाराची साक्ष निर्णायक ठरली. सदर प्रकरणात कोर्ट पैरवी म्हणून पोलीस अंमलदार संजय जटे यांनी काम पाहिले.











