तानाजी पाटीलाच्या नार्कोची CD डॉ पाटील यांच्या घरातुन जप्त – आरोप प्रत्यारोप
धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी या दुहेरी हत्याकांडात माफीचा साक्षीदार असलेला संशयीत केंद्रस्थानी आहे. तपासा दरम्यान तानाजी पाटील यांची नार्को चाचणी केली होती त्यात छोटा राजन टोळीतील एका शुटरचा उल्लेख करण्यात आला. डॉ पद्मसिंह पाटील यांच्या वकिलांनी याबाबत काही प्रश्न उपस्थितीत केले आहेत तर नार्कोची सीडी डॉ पाटील यांच्या घरातून जप्त केल्यावर निंबाळकर यांनी दबाव असल्याचा संशय व्यक्त केला.
पारसमल जैन हा 1985 पासुन पोलिसांचा अधिकृत विशेष खबरी, सोने चांदी, मार्बल व्यापारी, व्यापारी संघटनेचा अध्यक्ष, कापड दुकानदार असा ‘ खबरी व्यापारी ते गुन्हेगारी’ असा प्रवास आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत तो राणाजगजीतसिंह पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात निवडणुक लढवणार होता, न्यायालयाने तशी परवानगी दिली होती मात्र त्यावेळेत नामनिर्देशन दाखल करण्याची तारीख संपली होती. तानाजी पाटील याला मी ओळखत नव्हतो असे जैन याने त्याच्या कोर्टातील जबाबात सांगितले.
हत्या झालेल्या दिवशी तानाजी पाटील हे ठाणे परिसरात असल्याची माहिती तपासात समोर आली होती. त्यानंतर त्यांची नार्को एनालिसिस चाचणी घेण्यात आली. या चाचणीत तानाजी पाटील यांनी छोटा राजन टोळीतील शूटर विकी मल्होत्रा यांनी पवनराजे यांच्यावर गोळीबार केल्याचा दावा केल्याचे नमुद केले. मात्र या चाचणीतून मिळालेल्या सुगाव्यांचा तपास पुढे नेण्याऐवजी सीबीआयने त्या दिशेने तपास न करता केवळ माफीचा साक्षीदार परसमल जैन यांच्या कथित कबुली जबाबावरच अवलंबून राहिल्याचा आरोप डॉ पद्मसिंह पाटील यांच्या वकिलांनी केला.
6 जुन 2009 रोजी डॉ पाटील यांना सीबीआयने अटक केल्यावर 17 जुन 2009 रोजी पाटील यांच्या घराची झडती घेण्यात आली, त्यानंतर पंचासमक्ष जप्त वस्तूंचा पंचनामा करण्यात आला, त्यावर राणाजगजीतसिंह पाटील यांनी सही केली. पंचनाम्यानुसार घरी 7 लाख रोख रक्कम, 4 शस्त्र व काही कागदपत्रे सापडली ती जप्त केली. 2 मोझरबेअर कंपनीच्या सीडी एका पेपर बॅगमधुन जप्त केल्या, त्यात तानाजी पाटील याच्या नार्को टेस्टचा व्हिडिओ होता. कळंबोली पोलिसांनी तपासा दरम्यान तानाजी पाटील याची नार्को टेस्ट केली होती, तो व्हिडिओ व सीडी पुराव्याचा भाग होता. ती सीडी व त्याचा ताबा पोलिसांकडे असणे अपेक्षित असताना ती डॉ पाटील यांच्या घरी कशी आली यावरून निंबाळकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले.
डॉ पाटील यांचे बंधु अजित बाबा यांची कन्या किर्ती यांच्या 2008 साली झालेल्या लग्नातील 142 फोटो असलेला अल्बम जप्त केला त्यात डॉ पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला हे एकत्र होते. जैनच्या मुलीचे 1 जुलै 2007 साली लग्न झाले, लग्नाला हत्याकांडातील काही आरोपी हजर होते. काही आरोपींचे व्यवसायिक व कौटुंबिक संबंध असल्याची कागदपत्रे सीबीआयने दोषारोप पत्रात जोडली आहेत.
लोकसभा निवडणुक निकाल लागून डॉ पद्मसिंह पाटील राष्ट्रवादीकडून खासदार झाले मात्र त्यांच्या वतीने मला व शुटर दिनेश तिवारी याला भेटायला जेलमध्ये कोणीही आले नाही. 2009 च्या विधानसभा निकालानंतर तुला सोडवू असे म्हणाले मात्र आमच्यावर एकामागून एक असे खोटे गुन्हे नोंद होत असल्याने मुलगी वर्षा हिला सीबीआयला पत्र लिहून हत्याकांडाची माहिती दे असे म्हणालो त्यानुसार तिने 27 एप्रिल 2009 ला पत्र दिले, असे जैन याने त्याच्या कोर्टातील जबाबात सांगितले. काही शब्द देऊन वाऱ्यावर सोडले, शिवाय उलट खोट्या गुन्ह्यात अडकवल्याने तो फुटला व खळबळजनक हत्याकांडाचा खुलासा केला.
3 जुन 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाल्यानंतर 3 वर्षांनी 6 जुन 2009 रोजी डॉ पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने अटक केली. राजकीय कारकीर्द व अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांनी कट रचत 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचा ठपका ठेवला. डॉ पद्मसिंह पाटील यांना 25 सप्टेंबर 2009 रोजी जामीन मिळाला आहे.











