धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे पोलिसांनी पकडलेल्या 10 कोटी 32 लाख रुपयांच्या हशीश ऑइल या अमली पदार्थाचे आंतरराज्य कनेक्शन समोर समोर आले असुन 2 आरोपीना अत्यंत शिताफिने अटक करण्यात आले आहे. टोल नाक्यावरील 8 सीसीटीव्ही फुटेजचे परीक्षण करून हे रॅकेट उघड केले असुन मुख्य सूत्रधारावर खुनासह ड्रग्ज पुरवठा केल्याचे गुन्हे नोंद आहेत.
गांजाच्या झाडाचा गर काढुन ऑइल बनवले जात होते, विशाखापट्टणम मधुन ऑइल आणुन मालेगाव येथे ड्रग्ज निर्मिती केली जायची, 2 आरोपीना 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यात वापरलेली कार, मुख्य सुत्रधार फरार असुन पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. चौघांची आंतरराज्य टोळी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
तुळजापूर नळदुर्ग रोडवर नाकाबंदी वेळी पोलिसांना एमएच 12 जीव्ही 1517 या गाडीवर संशय आला त्यावेळी त्यांनी पाठलाग केला असता आरोपीनी एक बॅग फेकून पळ काढला, त्यात 10 किलो हशीश ऑइल हे अमली पदार्थ होते, याची किंमत 10 कोटी 30 लाख रुपयाच्या आसपास आहे. वसीम इंद्रिस शहा वय 33 आणि मोसीन हयात खान वय 39 ( दोघे, दरेगाव नाशिक) यांना नळदुर्ग पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगावातुन अटक केली. हे दोघे आंध्र प्रदेशातून ऑइल घेऊन मालेगावपर्यंत सप्लाय करण्याचे काम करीत होते.
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे गांजाच्या झाडाचा गर काढून हशीश ऑइल तयार केले जात होते. या ऑइलवर प्रक्रिया करून मालेगावात ड्रग्जनिर्मिती केली जात होती, ड्रग्जनिर्मितीचे हे आंतरराज्य रॅकेट आता उघड झाले आहे. नळदुर्ग ते मालेगावपर्यंत 8 टोलनाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज मिळवले, कार नंबरवरून कारच्या मालकापर्यंत पोलिस पोहोचले. त्यांना विचारणा केली असता 15 दिवसांपूर्वी ही कार विकल्याचे सांगितले.
ड्रग्ज प्रकरणात मसूद खान (45, रा. मालेगाव) हा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्यावर खुनासह आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम व भुसावळमध्ये ड्रग्ज सप्लायचे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक नंदकिशोर सोळंके यांनी दिली. पोलिस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना, आयपीएस अधिकारी मेघना एन, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ पंकज देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.












