सत्ताधारी नगराध्यक्ष हतबल – आमदार राणाजगजीतसिंह पाटलांची पकड ढिली, दिव्या खाली अंधार
तुळजापूर – समय सारथी
तुळजापूर शहरात जुगार,मटका,चक्री, देह विक्रीसह अन्य अवैध धंदे वाढले असुन यातील एजेंटसह मुळं मालकावर कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा नगराध्यक्ष विनोद उर्फ पिटू भाई गंगणे यांनी दिला आहे. गंगणे यांनी शिष्टमंडळ घेऊन पोलिस ठाणे गाठले व कारवाई करा अशी मागणी केली. आम्ही तुम्हाला कुठे धंदा चालतो याची माहिती फोटोसह देऊ तुम्ही कारवाई करा असे ते म्हणाले.
मुळात गंगणे हे सत्ताधारी नगराध्यक्ष असुन ते अवैध धंदे व इतर बाबीने वैतागले असुन आक्रमक झाल्याचे दिसले. एजेंटपेक्षा मुळं मालकांवर कारवाई करा असा आग्रह त्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडे धरला आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची दिशा व विविध संकल्पना मांडणाऱ्या आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मतदार संघात अवैध धंदे फोफावले असुन दिव्या खाली अंधार अशी स्तिथी झाली आहे.
आमदार पाटील यांनी जसे ड्रग्ज प्रकरणात ठोस माहिती देत कारवाई करायला पोलिसांना भाग पाडले त्याच प्रमाणे आता त्यांच्या मार्गदर्शनाची पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे. तुळजापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था सुधारावी यासाठी आमदार पाटील महसूल व पोलिस प्रशासनात काय बदल करतात हे पाहावे लागेल.अवैध धंद्याची मालकी व पार्टनरशिप या निमित्ताने जनतेसमोर येणे गरजेचे आहे, यासाठी ही नामी संधी आहे.
तुळजापूर शहरातील पाणी टंचाई, स्वच्छता यासह विविध समस्या सोडवण्यासाठी व प्रशासनाचे लक्ष वेधन्यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले, गेल्या अनेक दिवस उठवलेला आवाज व मांडलेली वस्तुस्तिथी त्रासदायक ठरत होती त्यातच या निवेदनबाजीचे ‘मुळ’ आहे.
तुळजापूर शहर हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानीचे गाव आहे. दररोज लाखो भाविक आई तुळजाभवानीच्या दर्शनाकरिता तुळजापूर शहरात येत असतात, परंतु काही समाज कंटकामार्फत आई तुळजाभवानीच्या पवित्र पावन नगरीत जुगार,मटका,चक्री, देह विक्री असे अनेक अवैध धंदे चालु असल्याचे निदर्शनास येत आहे. तत्काळ अवैध धंदे तत्काळ बंद करून संबंधित धंदे चालवणाऱ्यावर एजंट यांच्यावर कार्यवाही न करता मूळ मालकावर कडक कार्यवाही करावी अन्यथा पुढील आठवड्यात आपल्या कार्यालायासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, याची गंभीरपणे नोंद घ्यावी असा इशारा दिला आहे.
तुळजापूरची बदनामी करणारे बोंबोबोंब करीत आहेत त्यामुळे खरी परिस्थिती जनतेला कळायला हवी. यासाठी निवेदन दिले असुन मुळ मालकावर कारवाई करावी अशी मागणी नगराध्यक्ष विनोद उर्फ पिटू भाई गंगणे यांनी केली आहे. यावेळी नगरसेवक, गटनेते उपस्थितीत होते.











