रस्त्याच्या पोलवर बॅनर न लावण्याचा ठराव – अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दबाव
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेच्या हद्दीत नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह अन्य भागात लावण्यात आलेल्या अनधिकृत बॅनर, होर्डिंगज विरोधात मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या आदेशानंतर कारवाईला सुरुवात झाली आहे. शहरातील अनधिकृत बॅनरचा मुद्दा चव्हाट्यावर आल्यानंतर ही कारवाई सुरु करण्यात आली. नगराध्यक्षा नेहा काकडे, उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे या सत्ताधारीसह अन्य सहयोगी पक्षाचे नेते, कार्यकर्ते व विविध खासगी व्यक्तीनी लावलेले काही बॅनर काढण्यात आले. उर्वरीत बॅनर यथावकाश काढण्यात येणार असल्याचे कळते.
धाराशिव नगर परिषदेच्या हद्दीतील अनाधिकृत बॅनर लावल्यास कारवाई करण्यात यावी असे आकाश मधुकर तावडे यांनी सर्वसाधारण सभेत सुचविले. शहरामध्ये 21 ठिकाणी अधिकृत बॅनरची जागा निश्चित केलेली आहे, अनाधिकृत ठिकाणी बॅनर लावण्यास हायकोर्टाची बंदी आहे असे नगरसेवक सचिन पवार यांनी सांगितले.
महापुरूषांचे पुतळे आहेत त्यांच्या पासुन 100 फुट जागा सोडून बॅनर लावण्यात यावे असे अभिजीत काकडे यांनी सुचविले. नगर परिषदेच्या शहरातील जागेमधील दर्शनिय स्थळ शोधून काढून त्या ठिकाणी बॅनर लावण्याची जागा निश्चीत करण्यात यावी, जेणे करून नगर परिषदेच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल असे नगरसेवक अमित शिंदे यांनी सभागृहास सुचविले. बॅनरचा कालावधी निश्चीत करण्यात यावा असे प्रदिप मुंडे यांनी सांगितले. जो मनमानी करेल, नियमानुसार बॅनर लावणार नाही व बॅनर छपाई करणारे यांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा असे अभिजीत काकडे यांनी सांगितले.
वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये या करीता रस्त्याच्या मध्यवर्ती भागातील लाईटच्या पोलवरती बॅनर लावण्यात येऊ नये असे सर्वानुमते ठरले मात्र खुद्द नगराध्यक्षा यांनीच पोलवर मध्यभागी बॅनर लावुन ठरावाचे उल्लंघन व नियमभंग केला. नगर परिषदेने घेतलेल्या ठरावानुसार शहरातील सर्व अनधिकृत बॅनर लावणाऱ्यावर फौजदारी व इतर कारवाई होणार का ? हे पाहावे लागेल.
नगर परिषदेने वारंवार ठराव घेतले असले तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर याकडे दुर्लक्ष करण्यासाठी दबाव टाकला जातो. स्वच्छ व सुंदर धाराशिवसाठी नियमांचे पालन होणे गरजेचे आहे, नगर परिषदेचा कारभार पाहण्याऱ्या व त्यावर नियंत्रण असलेल्या नेतृत्वाने नवनवीन घोषणा बरोबरच अंमलबजावणीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.











