सोलापुर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची कारवाई, मोठे रॅकेट उघड होणार, केंद्राला टाळे
सोलापुर – समय सारथी
माढा तालुक्यातील मोडनिंब येथील स्वरांजली कला केंद्रावर सुरु असलेल्या वेश्या व्यवसाय रॅकेटचा सोलापूर पोलिसांनी सापळा रचून पर्दाफाश करीत 25 पिडीत महिलांची सुटका केली. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शना खाली टेंभुर्णी ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी तथा परिविक्षाधीन आयपीएस राहूल आत्राम यांनी नियोजनबद्ध सापळा रचून छापा टाकला. पोलिस याचा तपास करीत असुन मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.
स्वरांजली कला केंद्राचे मालक जगन्नाथ तुकाराम घाडगे (रा. अरण ता. माढा) कलाकेंद्राचे चालक विशाल लता पवार (वय 24 रा. जामखेड ता. अहिल्यानगर) मॅनेजर बाळासाहेब गोविंद गिड्डे (वय 63 रा. अरण ता. माढा) पार्टी मालकीन छाया बाळासाहेब सुरवसे (वय 35 रा. आंबेजोगाई जि. बीड) रिक्षाचालक नितीन चांगदेव चव्हाण (वय 49 रा. मोडनिंब ता. माढा), स्वागत लॉज मॅनेजर सिध्दांत सुखदेव गायकवाड (वय 33 रा. मोडनिंब ता. माढा) यांच्या विरोधात मानवी तस्करी व अनैतिक व्यापाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक आरोपीना माढा न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. डी. कुलकर्णी यांनी त्यांना 17 मार्च मंगळवारपर्यंत पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील एकूण 25 पीडित महिलांची सुटका केली असून न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व महिलांना सोलापूर येथील सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
केंद्रातून मोठ्या प्रमाणात अश्लील साहित्य, मोबाईल, रेकॉर्डिंग डिव्हाइसेस जप्त करण्यात आले आहेत. पिडित तरुणींना बाहेरून आणून येथे कोंडून ठेवण्यात येत होते. त्यांना नृत्याच्या नावाखाली ग्राहकांसोबत अनैतिक कामे करायला भाग पाडले जात होते. कला केंद्र मालक, मॅनेजर व कामगार हे आर्थिक फायद्यासाठी पर जिल्हा व पर राज्यातून महिलांना आणून त्यांच्याकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेत होते.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधिक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलिस अधीक्षक, अंजना कृष्णा व्ही एस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलिस अधिकारी तथा परिविक्षाधीन आयपीएस राहुल आत्राम, पोलिस उपनिरीक्षक सुनील सरडे, पोलिस उपनिरीक्षक विलास रणदिवे, हवालदार प्रदीप पर्वते, सहदेव देवकर, चालक नितीन डाकवाले, पोलिस कॉन्स्टेबल प्रसाद अनुभुले व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील हवालदार मंगेश पवार, गणेश गुटाळ, कॉन्स्टेबल भोसले, निकम व प्रभारी अधिकारी टेंभुर्णी यांचे मुख्यालयाकडील चालक व आरटीपीसी, महिला कॉन्स्टेबल धनश्री मांढरे यांनी ही कारवाई केली आहे.

बीड जिल्ह्यातील उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी नर्तिका पुजा गायकवाड हिचा पिडीत महिलांमध्ये समावेश असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पुजा ही धाराशिव जिल्ह्यातील पिंपळगाव येथील तुळजाई कला केंद्रात होती त्यावेळी बर्गे व हिचे प्रेमसंबंध जुळले त्यानंतर त्यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. ‘मालकीण’ परंपरा अनं संपत्ती लुट, ब्लॅकमेल व आत्महत्या असे हे चक्र होते. पुजा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती, जामिनावर सुटताच ती तिथे गेली.
धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्र वगळता सर्व 5 कला केंद्राचे परवाने जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी कायमस्वरूपी रद्द केले आहेत. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी अवैध धंदे बाबत ठोस भुमिका घेतल्याने हे शक्य झाले असुन शेजारील सोलापूर जिल्ह्यात कला केंद्राच्या नावाखाली रॅकेट उघड झाले आहे. धाराशिव जिल्ह्यातील काही कला केंद्र मधील नर्तिका यापुर्वी सेक्स रॅकेटमध्ये सापडल्या होत्या. काहींनी परवाने रद्द आदेशा विरुद्ध अपील केले असुन त्यावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.











