राजकीय स्वार्थ, सहानुभूती व लाभ – तानाजी पाटील नार्को दुर्लक्षित, निंबाळकर परिवारावर गंभीर आरोप
धाराशिव – समय सारथी
राजकीय स्वार्थ, सहानुभूती व लाभ मिळविण्यासाठी डॉ पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात निंबाळकर परिवाराने भूमिका घेतली असा आरोप करण्यात आला. पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी माजी गृहमंत्री तथा माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील यांच्या वतीने ऍड भुषण महाडिक यांनी तब्बल 1 हजार 250 पानाचा लेखी युक्तिवाद कोर्टात सादर केला. त्यात त्यांनी डॉ पद्मसिंह पाटील यांच्यावरील सर्व आरोप फेटाळत निंबाळकर परिवार व तपास यंत्रणावर अनेक गंभीर आरोप केले. पारसमल जैन हा यात माफीचा साक्षीदार आहे.
डॉ पद्मसिह पाटील यांच्या वतीने ऍड महाडिक यांनी 25 नोव्हेंबर रोजी तोंडी युक्तिवाद संपवला, त्यांनी सलग 24 सुनावणीत बाजु मांडली. डॉ पद्मसिंह पाटील हे या खुन खटल्यात कसे निर्दोष आहेत व त्यांच्यावरील आरोप चुकीचे आहेत, माफीचा साक्षीदार हा विश्वासहर्य नाही असे म्हणत पुरावे, तपासातील त्रुटी व इतर खटल्यातील न्यायालयाचे निकाल मांडले. 28 जानेवारी 26 रोजी ऍड महाडिक यांनी 1 हजार 250 पानाचे लेखी म्हणणे मांडले.
युक्तिवाद नुसार, माफीचा साक्षीदार जैन याने दिलेल्या जबाबावर हा खटला पुर्णपणे अवलंबून असुन सीबीआयने एकतर्फी, पुर्वनियोजित तपास केला. कै पवनराजे निंबाळकर यांच्या परिवाराने राजकीय स्वार्थाच्या कथित हेतुने डॉ पद्मसिंह पाटील यांच्यावर नेहमी आरोप केले. सीबीआयने महाराष्ट्र पोलिसांकडुन मिळालेल्या आधीच्या तपास नोंदीचा योग्य वापर केला नाही. आरोपी व माफीचा साक्षीदार, पवन राजे यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले नाही.
माफीचा साक्षीदार आणि आरोपी दिनेश तिवारी यांच्यावर 8 फेब्रुवारी ते 20 एप्रिल 2009 या कालावधीत मुंबई गुन्हे शाखेने 5 गुन्ह्यांमध्ये ताब्यात ठेवले. त्यानंतर त्यांच्या जबाबाच्या आधारे सर्व आरोपींना अटक करून तपास केला. जैन व तिवारी याच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. पवनराजे यांच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांमुळे त्यांनी सभासद, शेतकरीसह अनेक शत्रू निर्माण केले होते त्यामुळे त्यांचे अनेक शत्रू होते. आर्थिक व्यवहार त्यातून हत्या झाली.
डॉ पाटील यांनी दिलेल्या अधिकारांचा वापर समाज सेवेसाठी करण्या ऐवजी पवनराजे यांनी त्याचा गैरवापर करून वैयक्तिक व आर्थिक लाभ घेतला. तेरणा साखर कारखाना, जिल्हा मध्यवर्ती बँक संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहारांमुळे गुन्हे दाखल होऊन त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. त्या परिस्थितीत पवनराजे यांना डॉ पाटील यांनी वाचवावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती मात्र डॉ. पाटील यांनी त्यास नकार दिल्यामुळेच पवनराजे व त्यांच्या कुटुंबीयांनी डॉ पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचा दावा करण्यात आला.
पवनराजे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीदेवी व चालक समद काझी यांच्या पत्नी रिजवाना काझी यांनी जनतेमध्ये सहानुभूती निर्माण करण्यासाठी प्रचार मोहीम राबविल्याचा आरोप केला. पवनराजे यांच्या अस्थी घेऊन अनवाणी मोर्चे काढण्यात आले व मतदारांशी संपर्क साधण्यात आला, राजकीय हेतूने हे करण्यात आले.
3 जून 2006 रोजी हत्या झालेल्या दिवशी तानाजी पाटील हे ठाणे परिसरात असल्याची माहिती तपासात समोर आली होती. त्यानंतर त्यांची नार्को एनालिसिस चाचणी घेण्यात आली. या चाचणीत तानाजी पाटील यांनी छोटा राजन टोळीतील शूटर विकी मल्होत्रा यांनी पवनराजे यांच्यावर गोळीबार केल्याचा दावा केल्याचे नमुद केले. मात्र या चाचणीतून मिळालेल्या सुगाव्यांचा तपास पुढे नेण्याऐवजी सीबीआयने त्या दिशेने तपास न करता केवळ माफीचा साक्षीदार परसमल जैन यांच्या कथित कबुली जबाबावरच अवलंबून राहिल्याचा आरोप केला.
4 जुलै 2011 पासुन सुमारे 14 वर्षापासुन या दुहेरी खुन खटल्याची सुनावणी सुरु आहे. हा खटला जलदगतीने चालवुन 27 मार्च 2026 पुर्वी निकाल द्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या कोर्टात सुनावणी होत आहे. सुनावणी दरम्यान 128 साक्षीदार यांची साक्ष नोंदविण्यात आली आहे.
माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, पारसमल जैन बादला, शुटर दिनेश तिवारी, मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, लातुर येथील सतीश मंदाडे, शुटर पिंटू सिंग, उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे हे दुहेरी हत्याकांडात संशयित आरोपी आहेत.











