धाराशिव – समय सारथी
निलेश घायवळ टोळीतील अमोल लाखे याला वारजे पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथुन अटक केली आहे. लाखे हा 2 मकोका गुन्ह्यात गेली 4 महिन्यांपासून फरार होता. वारजे माळवाडी व कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यांमध्ये अमोल लाखे फरार होता. त्याच्यावर शाळेच्या पुरवठादार महिलेला धमकावून खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप आहे. लाखे हा घायवळच्या जवळचा असुन धाराशिव जिल्ह्यात या टोळीने पवनचक्की माध्यमातून बस्तान बसविले होते.
पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांना माहितीदारांकडून लाखे बार्शीत असल्याची खबर मिळाली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे खात्री केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी व पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे यांच्या सूचनेनुसार पोलिसांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केली. त्याच्याकडून टोळीतील इतर गुन्ह्यांबाबत माहिती मिळण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मुख्य आरोपी आणि टोळीप्रमुख नीलेश घायवळ अद्याप फरार आहे. तो सध्या ब्रिटनमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांनी ब्रिटिश उच्चायुक्तांशी संपर्क साधत पत्रव्यवहार सुरू केला आहे. कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी टोळीविरोधात मकोका अंतर्गत कडक कारवाई सुरू केली आहे. घायवळ विरोधात लूक आऊट नोटीस काढली आहे.











