धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील भुम तालुक्यात आगामी काळात शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसू शकतो, नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते यांची एक बैठक पार पडली त्यात पक्ष सोडण्याची अनेकांनी मानसिकता बोलुन दाखवली. धाराशिव तालुक्यासह अनेक ठिकाणी शिवसेना उबाठा गटाला जिल्हा परिषद निवडणुकीपुर्वी गळती लागली होती, निकालानंतर आणखी परिणाम जाणवू शकतात.
भुम तालुक्यात शिवसेना उबाठा गटाने 5 जिल्हा परिषद व 9 पंचायत समिती सदस्य उभे केले होते मात्र त्यापैकी एकही जागा जिकंता आली नाही, त्यांना पक्षश्रेष्टीकडुन अपेक्षित मदत व रसद मिळाली नाही असा सुर आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीत कोणाची सत्ता येते यावर आगामी समीकरण ठरणार आहे. नाराज गटातील काही जण शिवसेना शिंदे, धनंजय सावंत गट, राष्ट्रवादी व भाजप अश्या पर्यायाची चाचपणी करीत आहेत, त्यांच्यात चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत.
आगामी काळात भुम तालुक्यातील 72 ग्रामपंचायत निवडणुका असल्याने हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. पक्षश्रेष्टी, खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हा प्रमुख रणजित पाटील, संपर्क प्रमुख यांच्यावर नाराजीचा सुर आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ईट,पाथरूड व देवळाली येथे 3 सभा घेतल्या मात्र त्यांना लोकसभेसारखा करिष्मा दाखवता आला नाही. नाराजी दुर करणे व मनधरणी हे एक आव्हान असणार आहे.











