धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी अध्यक्षपदाचा तिढा अजुन कायम आहे. भाजप व शिवसेनाने अध्यक्ष पदावर दावा केला असुन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सासरवाडीकडुन श्रद्धांजली व राजकीय सन्मान म्हणुन अध्यक्षपद द्यावे अशी मागणी काही कार्यकर्ते करीत आहेत. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे परदेश दौऱ्यावर असुन ते आल्यानंतर यात शिष्टाई करणार असुन त्यानंतर हा तिढा सुटू शकतो.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा निर्णय महायुतीत अंतीम असणार आहे. शिवसेनेतील सावंत गट हा महायुतीत सहभागी होणार का? याचा निर्णय सुद्धा याचं बैठकीत होऊ शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षश्रेष्ठीचा निर्णय अंतीम असल्याची भुमिका अगोदरच आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी स्पष्ट केली आहे, त्यामुळे ही बैठक महत्वाची असणार आहे. पालकमंत्री यांची भुमिका महत्वाची ठरणार आहे.
भाजपने अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांचे नाव ‘माऊली’ म्हणत यांचे नाव कायम केले आहे तर शिवसेनेने सुद्धा दावा केला आहे. माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा ताई गायकवाड यांचे ‘मातोश्री’ म्हणुन नाव पुढे केले आहे. भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या दोन्ही गटांनी आपापले सदस्य नजरकैदेत सुरक्षित स्थळी ठेवले आहेत. शिवसेनेचे 2 सदस्य व अपक्ष भाजपच्या गोटात आहेत, कधी कोकण, कर्नाटक, मुंबई अशी सहल सुरु आहे.
संख्याबळ व इतर बाबी पाहता अध्यक्षपदावर ‘माऊली’ म्हणुन अर्चना पाटील यांचे नाव महायुतीत निश्चित मानले जात आहे. उपाध्यक्ष, सभापती रुपी सत्तेत वाटा व शिवसेनेच्या एका गटाची ‘मनधरणी’ हे विषय चर्चेपुरते राहिले असुन त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या बैठकीत अंतीम निर्णय होऊ शकतो.
भुम परंडा वाशी येथे नगर परिषद निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप राष्ट्रवादीसह इतर पक्ष लढाई, आमदार सावंत यांना राजकीय विरोध, सावंत यांनी घराणेशाही विरोधात केलेली वक्तव्य व घेतलेल्या प्रतिज्ञा, सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांना फोडून त्यांना दिलेले राजकीय पाठबळ असे पक्षीय कुरघोडी व घरफोडीचे मुद्दे कळीचे ठरतं आहेत.











