धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्याच्या अस्मितेचा आणि प्रशासकीय हक्काचा एक मोठा विजय झाला आहे. सन 2017 मध्ये लातूर येथे स्थलांतरित करण्यात आलेले धाराशिव पोस्ट मुख्यालय आता पुन्हा एकदा अधिकृतपणे धाराशिवमध्ये परत आले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकार आणि टपाल विभागाकडे केलेल्या अथक पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यालयाचे पुनरागमन 2017 पासून लातूरमधून सुरू असलेला धाराशिव जिल्ह्याचा पोस्ट कारभार आता स्वतंत्रपणे धाराशिवमधूनच चालणार आहे. लातूरसाठी स्वतंत्र विभाग: केवळ धाराशिवच नव्हे, तर लातूर जिल्ह्यासाठीही स्वतंत्र पोस्ट विभाग आणि मुख्यालयाला मंजुरी मिळवून देण्यात खासदार निंबाळकरांना यश आले आहे. कार्यान्वित तारीख 31 जानेवारी 2026 पासून दोन्ही जिल्ह्यांचे विभाग स्वतंत्ररित्या कार्यरत झाले आहेत.
हे मुख्यालय लातूरला गेल्यामुळे जिल्हयातील नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत आणि संबंधित मंत्रालयाकडे ठोस पुरावे आणि प्रशासकीय सुलभतेची गरज मांडली होती. “जिल्ह्याचा हक्क जिल्ह्यातच राहिला पाहिजे” या भूमिकेवर ते ठाम राहिल्याने अखेर केंद्र सरकारने या मागणीची दखल घेत स्वतंत्र मुख्यालयाचा आदेश जारी केला.
या निर्णयामुळे प्रशासकीय कामात सुलभता येईल, टपाल सेवा अधिक वेगवान होतील आणि जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल. धाराशिव आणि लातूर या दोन्ही जिल्ह्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक ठरला आहे.
“हा केवळ माझा विजय नसून धाराशिवच्या जनतेचा आणि त्यांच्या हक्काचा विजय आहे. प्रशासकीय विकेंद्रीकरण झाल्यामुळे आता सामान्य माणसाची कामे अधिक सोयीस्कर होतील.” असे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले.












