धाराशिव – समय सारथी
महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पएका आरोपीस जन्मठेपेची व 25 हजार दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. धाराशिव येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांनी हा निकाल दिला. या प्रकरणात अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन एस. सूर्यवंशी यांनी प्रभावी युक्तिवाद केल्याने आरोपी दशरथ मुरलिधर सरवदे याला शिक्षा मिळाली.
आरोपी दशरथ सरवदे हा फिर्यादी निता शशिकांत विधाते यांच्यासोबत भाड्याच्या घरात राहत होता. फिर्यादीचे पती मागील 15 वर्षांपासून वेगळे राहत असल्याने आरोपी व फिर्यादी यांची ओळख झाली होती. सुरुवातीला काही महिने दोघे एकत्र राहत होते; मात्र त्यानंतर आरोपीने फिर्यादीस त्रास देण्यास सुरुवात केली. 26 मार्च 17 रोजी रात्री जेवणानंतर घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपी व फिर्यादी घरात खाली आले असता आरोपीने पुन्हा भांडण करून तिच्या अंगावर रॉकेल ओतून काडीने पेटवून दिले.
फिर्यादीचा मुलगा सुजित विधाते याने आईचा आरडाओरडा ऐकून घटनास्थळी धाव घेतली व पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीच्या नातेवाईकांनी त्याला अडवून मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला.त्यानंतर सुजितने जखमी आईला रिक्षाने जिल्हा शासकीय रुग्णालय, धाराशिव येथे दाखल केले.
उपचारादरम्यान शुद्धीवर असताना निता विधाते यांचा मृत्यूपूर्व जबाब पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नोंदविला. तसेच नायब तहसीलदार यांनी स्वतंत्र मृत्यूपूर्व जबाब घेतला होता. तपास अधिकारी पोउनी संग्राम जाधव यांनी मोबाईलद्वारे केलेले व्हिडिओ रेकॉर्डिंगही महत्त्वाचा पुरावा ठरला. सरकार पक्षाने एकूण 13 साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून मुलगा सुजित विधाते याची साक्ष, दोन लेखी मृत्यूपूर्व जबाब व व्हिडिओग्राफीतील जबाब हे परस्पर सुसंगत असल्याचे सिद्ध करण्यात आले.आरोपीच्या कपड्यांवर रॉकेलचे अंश आढळल्याचे न्यायवैज्ञानिक अहवालातून स्पष्ट झाले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अभिश्री डी. देव यांनी साक्षीपुरावे व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन एस. सूर्यवंशी यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी दशरथ सरवदे यास भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत जन्मठेप व 25 हजार दंड अशी शिक्षा सुनावली. ठोस पुराव्याअभावी आरोपीची आई शहाबाई सरवदे, मावशी प्रमिला/शोभा घाडगे व आजी कस्तुराबाई गायकवाड यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे कोर्ट पैरवीचे काम महिला पोलीस नाईक पी. एस. तेलप साठे यांनी पाहिले.












