धाराशिव – समय सारथी
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, छत्रपती संभाजीनगर कृती विभागाने धाराशिव तालुक्यात मोठी कारवाई करत अफूच्या अवैध लागवडीचा पर्दाफाश केला असून तब्बल 12 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. धाराशिव तालुक्यातील खेड येथे ही कारवाई करण्यात आली असुन यात 4 शेतकरी सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीनुसार धाराशिव तालुक्यातील खेड या गावात काही शेतकरी गांजा लागवड करीत असल्याचे कळाले, त्यानुसार छापा टाकला. शेतजमिनीत अफूची झाडे अवैधरित्या लागवड करून त्यांची देखभाल व रखवाली करण्यात येत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी शेतकरी लिंबराज पाडुरंग लोमटे, रामहारी नामदेव लोमटे, नरहरी गोविंद लोमटे व ज्ञानेश्वर वसुदेव टकले यांचा सहभाग निष्पन्न झाला आहे.
पोलिसांनी घटनास्थळी कायदेशीर पंचनामा करून फुल व बोंड्यासह एकूण 83 किलो अफूची लहान-मोठी झाडे उपटून जप्त केली. या प्रकरणी पोलीस ठाणे ढोकी येथे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे सहायक पोलीस उपनिरीक्षक हनुमान पुरके यांच्या फिर्यादीवरून एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क) व १८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राऊत, पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस अधीक्षक अजीत टिके व निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे, पोलीस निरीक्षक गीता बागवडे, सपोनि. दीपाली पाटील, सपोउपनि. वाहेद मुल्ला, हनुमान पुरके, हवालदार शैला टेळे, सुरेश राउत, नागेश केंद्रे, निलेश सरपाळे, कैलास गाडेकर, नितीन जाधव, रविद्र साळवे, सुरज जोनवाल, ज्ञानेश्वर चव्हाण, हरीचंद्र मुंढे, अमितसिंग ठाकुर, अतुल तुपे, आम्रपाली सुर्यवंशी, ज्योती किर्तीकर, प्रियंका पवार यांनी केली आहे.
युवा वर्ग नशेच्या आहारी जात असल्याने सर्व प्रकारचे कोणतेही नशेचे गांजा, अफु, ड्रग्ज अंमली पदार्थ बाळगणारे व अंमली पदार्थांची विक्री, साठा किंवा लागवड करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले असून नागरिकांनी अशा प्रकारची माहिती पुढे येऊन पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











