धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील कलाकेंद्राचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महाकाली कला केंद्रावर तमाशा पहायला गेलेल्या एका तरुणाचा त्याच्याच मित्रानी खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे, या प्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात 5 जणाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वडील भागवत मुंडे यांनी तक्रार दिली.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साळेगाव येथील 37 वर्षीय सतीश मुंडे असे मयत तरुणाचे नाव आहे. घटनेच्या दिवशी तो आपल्या काही मित्रांसह धाराशिव जिल्ह्यातील महाकाली कला केंद्रावर बारी पाहण्यासाठी गेला होता. मित्रांनी दारू पाजून बारी पाहण्यासाठी नेले आणि तमाशा पाहून परत जाताना जुन्या भांडणाचा राग मनात धरून जीवे मारल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
आरोपीनी लाथा बुक्क्यांनी सतीश मुंडे याच्या पोटावर आणि छातीवर मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला. शेख आजमुद्दीन, शेख रौफ, संजय गीते, मधुकर इंगळे आणि दत्ता तोंडे अशी आरोपींची नावे आहेत, पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक भोजगुडे तपास करीत आहेत.
धाराशिव जिल्यातील तुळजाई, पिंजरा, साई, गौरी व कालिका या 5 केंद्रचे परवाने जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी कायमस्वरूपी रद्द केले आहेत. त्यातील काही जणाच्या आदेशाला विभागीय आयुक्त यांनी स्थगिती दिली आहे. कागदोपत्री बंद असलेल्या काही कलाकेंद्र पैकी काही छुप्या मार्गाने सुरु आहेत. महाकाली हे एकमेव केंद्र सुरु आहे या केंद्रचा परवाना रद्द करण्याचा पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला आहे मात्र निर्णय झालेला नाही. महाकाली केंद्र बाबत प्रकरण उच्च न्यायालयात सुरु असुन तिथे तारीख पे तारीख सुरु आहे.












