धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील शहापूर जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुनील बनसोडे व शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार कचरू सगट हे दोन्ही उमेदवार गुन्हेगारी पार्शवभुमीचे असल्याने शहापूर कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने ‘हॉट’ बनले आहे. त्यातच सगट यांना हद्दपारीची नोटीस पाठवल्याने राजकीय घमासान सुरु आहे. राजकीय पाठबळ कोणाचे ? हद्दपारीच्या कारवाईसाठी दबाव कोणाचा ? असा सवाल होत आहे.
शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार कचरू मल्हारी सगट यांना 2 वर्षासाठी धाराशिव, लातुर व सोलापूर या 3 जिल्ह्यातुन हद्दपार करण्याची नोटीस पाठवण्यात आल्यानंतर सुनावणी झाली असुन निर्णय राखून ठेवला आहे. सगट यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न 307, दरोडा 395, शासकीय कामात अडथळा 353 या 3 गुन्ह्यांसह 5 अदखलपात्र गुन्हे नोंद आहेत. हद्दपारीच्या कारवाईसाठी एका नेत्याने मोठे ‘परिश्रम’ घेतल्याची सुत्रांची माहिती आहे.
शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवारावर राजकीय आकसापोटी कारवाई करण्यात आली असुन बनसोडे यांना अभय का? असा सवाल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थितीत केला असुन प्रशासकीय अधिकारी यांना चांगलेच फैलावर घेतले. बनसोडे यांच्यावर तर हत्या, खंडणी, मकोका,एमपीडीए सारख्या कारवाया झाल्या असुन गजा मारणे टोळीचा ‘शार्प शुटर’ अशी ओळख आहे. असे असताना अभय का? असा सवाल उपस्थितीत केला.
बनसोडे हे भाजप पक्षाशी संबंधित असुन त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी देण्यात आली आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केलेल्या विकासामुळे बनसोडे यांना जनसेवेची प्रेरणा मिळाली असल्याने आमदार पाटील ‘प्रेरणा स्थान’ व गळ्यातील ताईत बनले आहेत. युवा नेते मल्हार पाटील यांनी सभा घेत विजयासाठी यंत्रणा उभी करीत कंबर कसली आहे तर सगट यांच्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिष्ठापणाला लावली आहे.
आमचा असा तर तुमचा पण काही कमी नाही, तो तसा असे दाखविण्याचे प्रयत्न सुरु असुन वातावरण ‘हॉट’ बनले आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलिस व प्रशासन या मुद्याला कसे हाताळतात आणि कोणती कारवाई करतात हे पाहावे लागेल. विकासाच्या गोंडस नावाखाली गुन्हेगारी क्षेत्रातील कुख्यात लोकांचे ‘उद्दातीकरण’ करून त्यांना ‘राजाश्रय’ देण्याचा नवीन विचार व धोरण सध्या धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात रुजत आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात अनेक टीका झाली त्यानंतर आता ‘शहापूर’ येथे काय होणार हे पाहावे लागेल.











