धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी भाजपा कटिबद्ध आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी होताच 10 कलमी संकल्प कार्यक्रम तातडीने राबविणार आहोत असे आमदार राणाजगजीतसिंह पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नेताजी पाटील, ऍड खंडेराव चौरे, नगरसेवक राहुल काकडे उपस्थितीत होते.
लोकाभिमुख, प्रगत व पारदर्शक प्रशासन अंतर्गत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कामासाठी आता स्वतः येण्याची गरज नाही. अर्जाची सोय थेट व्हाट्सअँपवर करण्यात येणार आहे. आरोग्य आपल्या दारी अंतर्गत ज्या गावात आरोग्य केंद्र नाही, तिथे दरमहा ‘सर्वरोग निदान शिबीर घेण्यात येईल. पर्यटन विकास अंतर्गत ऐतिहासिक, धार्मिक व निसर्गरम्य स्थळांचा विकास करून स्थानिकांचे उत्पन्न वाढवणार आहे.
महिला सक्षमीकरण अंतर्गत बचत गटांना बळकट करून भगिनींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यात येणार आहे. सौरऊर्जेचा प्रकाश वापर केला जाणार आहे. ग्रामपंचायती सौरऊर्जेवर आणून वीजबिल शून्य करणार आहे. अद्यावत शिक्षण देण्यावर भर असणार आहे. आपली मुले शिकतील ‘स्मार्ट’ शाळेत, प्रत्येक गावातील शाळा होईल डिजिटल केली जाईल.
रोजगाराची संधी मिळावी यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणावर भर आणि नवीन उद्योग आणून स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य दिले जाणार आहे. शेळीपालनातून आर्थिक क्रांती करण्यासाठी ‘उस्मानाबादी शेळी’ नाविन्यपूर्ण प्रकल्पातून आर्थिक दुर्बल गरजूंना समृद्ध करण्यात येणार आहे.
गाव तिथे पक्के रस्ते अंतर्गत शेत, पाणंद व गाव अंतर्गत रस्ते सुधारून दळणवळण सुविधा सुलभ करण्यावर भर असणार आहे. पाणी पुरवठा योजना अंतर्गत गावोगावी अपूर्ण असलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात येणार आहे. या सर्व कामासाठी महायुतीच्या उमेदवार यांना निवडणुन द्यावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे.












