धाराशिव – समय सारथी
सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री झाल्या असुन त्यांच्याबद्दल अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत. शांत पावलांनी सत्तेच्या उंबरठ्यावर… असे म्हणत त्यांनी दोघींचा एक फोटो टाकत काही बाबींचा उलगडा करीत भावना व्यक्त केल्या आहेत. सुनेत्रा पवार ह्या डॉ पद्मसिंह पाटील यांच्या बहीण असुन त्या तेरच्या आहेत. पाटील पवार नाते व एकमेकांना दिलेला आधार या प्रसंगी दिसुन आला.

राजकारणात काही व्यक्ती गडगडाट घेऊन येतात, तर काहींचे आगमन शांत असते, पण त्याची चाहूल काळाला लागते. सुनेत्रा वहिनींचा संभाव्य उपमुख्यमंत्रीपदाचा प्रवास हा दुसऱ्या प्रकारातला आहे. हा प्रवास घोषणा करत नाही, तो साक्ष देतो.
पवार कुटुंबात बाहेरून आलेली ही स्त्री, कधीच “मी”च्या गजरात नव्हती. तरीही काळाच्या ओघात तीच अधिक स्थिर, अधिक निर्णायक, अधिक पॉवरफुल ठरली. सत्ता ही केवळ पदात नसते, ती विश्वासात असते. आणि सुनेत्रा वहिनींनी तो विश्वास आयुष्यभर कमावला आहे.
शरद पवार यांची राजकीय दृष्टी आणि दीर्घ अनुभव, सुप्रिया सुळे यांची आधुनिक संवेदनशीलता आणि संवादक्षमता आणि सुनेत्रा वहिनींची न बोलता काम करणारी समाजकारणी भूमिका या तिघांची अदृश्य सांगड आज एका निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली आहे. हा केवळ व्यक्तींचा योगायोग नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत वळण आहे.
समाजकारणात सुनेत्रा वहिनी सतत कार्यरत राहिल्या. प्रसिद्धीपासून दूर, कॅमेऱ्यांपासून अलिप्त. महिलांचे प्रश्न, कुटुंबाचे दुःख, ग्रामीण जगण्याची कळ हे त्यांचे विषय होते. भाषणांपेक्षा भेटी, आश्वासनांपेक्षा आधार असे त्यांनी पोस्ट केले आहे.











