धाराशिव – समय सारथी
पक्ष विरोधी काम व प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत शिवसेना शिंदे गटाचे युवासेना लातुर व बीड जिल्ह्याचे निरीक्षक अविनाश खापे यांचे पक्षातुन निलंबन करण्यात आले आहे. उमेदवारी वरून वाद घालणे भोवले आहे. खापे यांचे निलंबन व कारवाई केली जाईल असे संकेत पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिले होते, साळवी हे पक्षाचे नेते असुन माजी आमदार आहेत त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही, अश्या प्रकारे प्रसिद्धीसाठी ऑडिओ व्हायरल करणे चुकीचे असल्याचे मंत्री सरनाईक म्हणाले होते. यां निलंबनानंतर शिवसैनिकात खळबळ उडाली असुन त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
शिवसेनेतील एबी फॉर्म वादाचा हा पहिला बळी असुन आगामी काळात अनेक पक्षीय बदल होऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे. खापे यांनी धाराशिव शिवसेना संपर्क प्रमुख राजन साळवी यांना फोन करून शिवसेना उमेदवारीवरून एबी फॉर्मवरून जाब विचारला होता व त्यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली होती. त्यानंतर शिवसैनिक यांनी धाराशिव येथे जाब विचारला होता.
पक्ष विरोधी काम केल्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचे काम आपणाकडून घडले आहे. सदरचे कृत्य हे संघटनेच्या विरोधात केले असल्यामुळे हा प्रकार गंभीर स्वरूपाचा लक्षात घेता वरिष्ठांच्या आदेशानुसार आपल्याला पदावरून निलंबित करण्यात येत आहे असे पत्र अविनाश खापे यांना युवासेनेचे मुख्य सचिव राहुल लोंढे यांनी दिले आहे.
शिवसैनिक म्हणुन घ्यायला आम्हाला लाज वाटते, तुम्ही दिवसभर शिवसैनिकांशी चर्चा करता व रात्री आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सोबत बोलणी करता. शिवसेनेचे पक्षाचे एबी फॉर्म आमदार राणाजगजीतसिंह पाटील व त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी वाटले त्यामुळे आम्हाला शिवसैनिक म्हणुन घ्यायला लाज वाटते असे अविनाश खापे हे साळवी यांना म्हणाले होते.
धाराशिव कळंब हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणुन विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला देण्यात आला आणि असे काय 4-6 महिन्यात घडले की शिवसेना कमी झाली आणि राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हातात गेली. अजित पिंगळे हे 4 वेळेस पराभुत उमेदवार आहेत, ते आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा माणूस आहे, त्यांनी सगळी सूत्र त्यांच्याकडे दिल्याचा आरोप खापे यांनी केला होता.
फॉर्म अजित पिंगळे यांच्या हातात विश्वास ठेवून दिले मात्र त्यांनी चुकीच्या पद्धतीने त्याचे वाटप केले. त्यांनी शिवसैनिक यांना विश्वासात न घेता ते दिले हे योग्य नाही असे म्हणत पालकमंत्री सरनाईक व साळवी यांनी भुमिका स्पष्ट केली होती.












